वाद चव्हाट्यावर! उपजिल्हाप्रमुखाचा सुषमा अंधारेंवर गंभीर आरोप; म्हणाले, “ठाकरे सेना आता अंधारे सेना’
बीड : (Vyanktesh Shinde On Sushama Andhare) जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर येत असून, ठाकरे गटात एकाचवेळी अनेक शिवसैनिकांनी सामूहिक राजीनामे दिले असल्याचे समोर येत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या (Uddhav Balasaheb Thackeray Group) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून अनेक शिवसैनिकांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
बीड (Beed) जिल्ह्यात ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांची खांदेपालट झाल्यानंतर पक्षातील अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातील ठाकरे सेना आता अंधारे सेना झाली असल्याचा आरोप देखील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून करण्यात येत आहे. तर, उपजिल्हाप्रमुख यांच्यासह तालुकाप्रमुखांनी आणि शेकडो शिवसैनिकांनी सामूहिक राजीनामे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे.
बीड जिल्ह्यात ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांची खांदेपालट झाल्यानंतर उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या आर्थिक देवाणघेवाण करत असल्याचा गंभीर आरोप देखील परळीचे तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी केला आहे. सुषमा अंधारे यांनी तीन नव्याने जिल्हाप्रमुखांची निवड केली. यानंतर आज अंधारे यांच्या परळीतील होमपीचवरून तालुकाप्रमुखांनी पत्रकार परिषद घेत आपले राजीनामे दिले आहेत.
जिल्ह्यात ठाकरे सेना नाही तर अंधारे सेना करण्याचे काम सुषमा अंधारे यांच्या माध्यमातून सुरू असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. तर, अंधारे यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळलो असल्याचे म्हणत पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे पक्षश्रेष्ठींना पाठवले आहेत. दरम्यान, या राजीनाम्यानंतर जिल्ह्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे.