पुणेराष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स

भाजप शहराध्यक्षांच्या बालेकिल्ल्यातच उद्यानाची वाट

कारंज्या, झुकझुकगाडी बंदमुळे उद्यानाचे वाजले तीन-तेरा

येरवडा : भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व पक्षाच्या शहराध्यक्षांच्या प्रभागातच श्री छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानाची दुरवस्था झाल्याने भाजपच्या शहराध्यक्षांच्या बालेकिल्ल्यातच उद्यानाची वाट लागली व तीन-तेरा वाजले म्हणण्याची वेळ सर्वसामान्य नागरिकांवर आली असून उद्यानासाठी कोट्यवधी रुपयांचा केलेला खर्च पाण्यात गेला असून याबाबत नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पक्षाचे शहराध्यक्ष व माजी आमदार जगदीश मुळीक हे भागातील स्थानिक नागरिक आहेत. विशेष म्हणजे त्यांचे बंधू योगेश मुळीक यांनीदेखील याच प्रभागाचे यापूर्वी प्रतिनिधीत्व केलेले आहे, तर त्यांच्या काळातच वडगाव शेरी भागातून कल्याणीनगर, रामवाडी भागाकडे जाणाऱ्या मार्गावर तब्बल ८ एकर जागेमध्ये उद्यान उभारून त्यासाठी जवळपास कोट्यवधींचा निधी खर्च करून उद्यान उभारून त्यास श्री छत्रपती शिवाजीमहाराज उद्यान असे नामकरण करण्यात आले. त्यावेळेस मोठा गाजावाजा करीत ४ जानेवारी २०१७ रोजी राज्याचे सध्या असलेले उपमुख्यमंत्री व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर या मंत्र्यांच्या हस्ते उद्यानाचे उद्‌घाटन करण्यात आले. तेव्हा नागरिकांसाठी गाण्यावर विद्युत रोषणाईवर कारंज्या व बालचमूसाठी खासकरून झुकझुक रेल्वेची सुविधा करण्यात आली होती.

मात्र सध्या रेल्वे गेल्या तीन महिन्यांपासून धूळ खात पडून आहे. यामुळे बालचमूमध्ये नाराजीचे सूर उमटले असून त्यासाठी बनविण्यात आलेले रूळदेखील गंजलेल्या अवस्थेत आहेत. त्यालगत झाडाझुडपांनी मोठ्या प्रमाणात विळखा घातला आहे. त्यामुळे असणारी रेल्वे ही असून अडचण व नसून खोळंबा अशी परिस्थिती झाली आहे. उद्यानात कर्नाटकमधील म्हैसूर शहराच्या पार्श्वभूमीवर लाखो रुपये खर्च करून विविध गाण्यांच्या तालावर व विद्युत रोषणाईवर कारंज्या बनविण्यात आले व त्याभोवती नागरिकांसाठी बैठक व्यवस्थाही करण्यात आली, पण गेल्या अनेक महिन्यांपासून कारंज्याच बंद असल्याने कोणी नागरिक या भागाकडे फिरकतही नाही. त्यामुळे जनतेच्या पैशातूनच उभारण्यात आलेल्या या उद्यानासाठीचा कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात गेला असल्याचे चित्र दिसून येत आहे. उद्यानात देशासाठी प्राणाची आहुती दिलेल्या महापुरुषांच्या प्रतिमा लावण्यात आल्या, पण प्रतिमेखाली झाडाझुडपांनी विळखा घातल्याने या प्रतिमांचा एक प्रकारचा अवमानच होत आहे.

जवळपास १० ते १२ माळी कामगारांची गरज असताना फक्त एकच महिला हे काम करीत असल्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होते. निवडणूक काळात विविध पक्षांतील राजकीय नेते विविध विकासकामांचा पाढा वाचून सर्वसामान्य मतदारांची दिशाभूल करून आश्वासने जरी देत असली तरी पण आतापर्यंत देण्यात आलेली आश्वासने ही फुसका बार ठरून ती हवेत विरली आहेत. यासंदर्भात पालिका अधिकाऱ्यांना विचारणा केल्यावर त्यांच्याकडूनदेखील उडवाउडवीची उत्तरे ऐकण्याशिवाय पर्याय राहत नाही. कारण उद्यान विभागाचे गुरुस्वामी तुमाले यांनीदेखील उद्यानाचा विकास करण्याचा फक्त तोंडी दावा केल्याने पालिकेचे अधिकारीदेखील सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यास सक्षम आहेत का? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या ह्या उद्यानाची अशा प्रकारची अवस्था असेल तर झोपी गेलेल्या राजकीय नेत्यांसह पालिका अधिकाऱ्यांना जाग येणार का? हा सवाल उपस्थित होत असून वेळप्रसंगी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करू.

-स्वप्निल माने, प्रदेशाध्यक्ष, सामर्थ जनशक्ती संघटना

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये