वारीने महाराष्ट्राला ‘नेटवर्किंग’ दिले : डॉ. सदानंद मोरे

पुणे : संतांनी महाराष्ट्राला सलोखा, समतेचा, मूल्यांचा वारसा दिला. ज्ञानेश्वर ते निळोबा यांच्यापर्यंत संतांनी आपल्या साहित्यातून मराठी भाषा समृद्ध केली आहे. मोठी परंपरा असलेली वारी ही विठ्ठलाची उपासना आहे. वारकरी नाही असे एकही गाव महाराष्ट्रात नाही. लाखोंच्या संख्येने एकत्रितपणे भक्तिरसात न्हाऊन निघणारा वारीचा पालखी सोहळा महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे,’ असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी केले.
लोकमान्य हास्ययोग संघ परिवाराच्या वतीने आयोजित ‘पंढरीची वारी’वरील व्याख्यानात डॉ. सदानंद मोरे बोलत होते. व्याख्यानासह दिंडी सोहळा, विठ्ठल-रुक्मिणी पूजन, अभंग गायन झाले. कोथरूड येथील राजलक्ष्मी सभागृहात झालेल्या सोहळ्याप्रसंगी हास्ययोग परिवाराचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुभाष देसाई, उपाध्यक्ष डॉ. जयंत मुळे, उपाध्यक्ष बंडोपंत फडके, सचिव पुष्पा भगत, माजी नगरसेविका वैशाली मराठे, पुनीत जोशी, डॉ. संदीप बुटाला, महेश साने, जयंत भिडे आदी उपस्थित होते. आजच्या काळात प्रत्येकजण विश्वाशी जोडू शकतो. मात्र, संतांनी वारीच्या माध्यमातून एकमेकांना जोडण्याचे काम केले. वारीने महाराष्ट्राला ’नेटवर्किंग’ दिले असल्याचे यांनी यावेळी सांगितले.