‘सावध! ऐका पुढल्या हाका…’; ऊर्जामंत्र्यांच्या भारनियमनाच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

मुंबई : आज राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी देशातील कोळसा संकटाच्या पार्श्वभूमीवर भारनियमनाचा निर्णय घेण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भारनियमावरुन राज्य सरकारवर खोचक शब्दांत हल्लाबोल केला आहे. फडणवीसांनी ट्वीट करत मविआवर राज्याला पुन्हा अंधाराच्या खाईत लोटल्याचा आरोप केला आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सावध! ऐका पुढल्या हाका. टँकरमुक्तीतून पुन्हा टँकरयुक्त, भारनियमनमुक्तीतून पुन्हा भारनियमनाकडे, राज्यात केवळ आणि केवळ भ्रष्टाचार, ‘नो गव्हर्नन्स’मुळे जनता हैराण असून आता परिणाम दिसू लागले आहेत. अधोगतीकडे वाटचाल सुरू आहे.
“आजपासून महाराष्ट्रात भारनियमन पुन्हा सुरू झाले. यंदा उन्हाच्या झळा तीव्र असताना जनता घामाघूम करण्याचं आणि राज्याला पुन्हा अंधाराच्या खाईत लोटण्याचं पाप महाविकास आघाडीनं अखेर केलंच. वाफाळ शब्दांपेक्षा प्रशासकीय कौशल्याचा थोडा कस लावून जनतेला तत्काळ दिलासा द्यावा, अशी आमची मागणी आहे,” असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.