“…तर आम्ही टोलनाके जाळून टाकू”, राज ठाकरेंचा राज्य सरकारला संतप्त इशारा
मुंबई | Raj Thackeray – सध्या राज्यात टोलच्या मुद्यावरून एकच खळबळ उडाली आहे. तर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे टोलच्या मुद्यावरून चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज ठाकरेंनी राज्य सरकारवर देखील हल्लाबोल केला. टोल रद्द केले नाहीत तर आम्ही टाेलनाके जाळून टाकू, असा थेट इशार राज ठाकरेंनी राज्य सरकराला दिला आहे.
राज ठाकरे आज (9 ऑक्टोबर) पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, मी दोन दिवसांनंतर टोलच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, टू व्हिलरला, फोर व्हिलरला टोल नाही. त्यामुळे आमची माणसं प्रत्येक टोलनाक्यावर उभे राहतील आणि त्यावेळी टू व्हिलरला, फोर व्हिलरला टोल लावू दिला जाणार नाही. पण जर याला कोणी विरोध केला तर टोलनाके जाळून टाकू. मग सरकारला काय करायचं ते करूदे, असा संतप्त इशारा राज ठाकरेंनी दिला.
काल देवेंद्र फडणवीस जे म्हणाले ते खरं आहे का? याला धांदात खोटचं म्हणायचं ना? मग नक्की हे पैसे जातात तरी कुठे? खरं म्हटलं तर टोल हा राज्यातील सर्वात मोठा स्कॅम आहे. त्यामुळे याची शहानिशा झालीच पाहिजे, असंही राज ठाकरे म्हणाले.