ताज्या बातम्या

फास्ट फॅशन : स्वस्त कपड्यांची चुकवावी लागते महागडी किंमत

Fast Fashion : सध्याच्या काळात तरुणाईच्या आहारापासून तर त्यांच्या फॅशनपर्यंतचा सगळा ट्रेंड बदलत आहे. कारण या आधुनिक आणि वेगवान युगात तरुणाई स्वत:च्या जीवनशैलीला अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. शाळकरी मुलांपासून तर तरुणांपर्यंत प्रत्येकजण मेकअप कपडे आणि सतत बदलणाऱ्या फॅशनच्या बाबतीत आपली जीवनशैली बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. याच फॅशनचे मुख्यतः दोन प्रकार मानले जातात. एक फास्ट फॅशन आणि दुसरा आहे स्लो फॅशन. बाजारात मुख्यत्वे सध्या फास्ट फॅशनची चलती आहे. ट्रेंडनुसार वागायचे म्हणजे नकळत कुठेतरी या ‘फास्ट फॅशन’च्या आहारी जाणे. परंतु या फास्ट फॅशनचे काही दुष्परिणामही माणसाला भविष्यात भोगावे लागू शकतात हे जाणून घेते देखील तितकेच गरजेचे आहे.

काय आहे फास्ट फॅशन ?

पूर्वी ऋतूमानानुसार फॅशन बदलायची. ऋतू बदलला की त्यानुसार कपडे डिझाइन केले जात असत, ज्याला स्लो फॅशन असे म्हटले जाते. आता मात्र फॅशन इंडस्ट्रीत वेगाने बदल होत आहेत. त्यामुळे फास्ट फॅशनला जास्त वाव मिळत आहे. जेवढ्या वेगाने फॅशन बदलत आहे, त्याच गतीने कपडे तयार केले जात आहेत आणि विकलेही जात आहेत. एवढंच काय तर ते त्याच गतीने कालबाह्यही होताना दिसत आहेत.

मुळात फास्ट फॅशन हे फॅशन उद्योगातील एक व्यवसाय मॉडेल आहे. यात स्वस्त कपड्यांचे जलद उत्पादन आणि उलाढाल यावर जोर दिला जातो. सतत बदलणाऱ्या ग्राहकांच्या आवडीनिवडी पूर्ण करण्यासाठी नवीन फॅशन ट्रेण्ड्स आणि डिझाइन्सचा सतत लॉंच करतात. सेलिब्रिटींनी लोकप्रिय केलेल्या ट्रेण्ड्सला परवडणाऱ्या किमतीत मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत उपलब्ध करून देतात आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर नफा मिळवतात.

फास्ट फॅशनचे दुष्परिणाम

प्रत्येक वेळी वेगळा लूक करण्यासाठी नवीन पोशाख खरेदी केले जातात आणि त्याची एकापेक्षा जास्त वेळा पुनरावृत्ती केली जात नाही, मात्र या सवईमुळे केवळ पैशाची बरबादीचं नाही तर पर्यावरणालाही हानी पोहोचवते. कपड्यांची पुनरावृत्ती न करण्याच्या ट्रेंडमुळे, वॉर्डरोब कपड्यांनी भरून जातो आणि काही काळानंतर ते टाकून दिले जातात. ज्याचे विघटन होण्यास अनेक वर्षे लागतात. जे पर्यावरणासाठी अत्यंत हानिकारक आहे. आकडेवारीनुसार, कोणत्याही कचऱ्यापैकी 57% कचरा फक्त कपड्यांनी भरलेला असतो.

जगभरातील शिपिंग आणि आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासामुळे होणाऱ्या वायू प्रदूषणापेक्षा केवळ कापड उद्योगातून उत्सर्जित होणारे कार्बन डायऑक्साइड आणि मिथेन यांसारख्या हरितगृह वायूंमुळे अधिक वायू प्रदूषण होते. दरवर्षी कपडे तयार करण्यासाठी 5.30 कोटी टन कापड धागा तयार होतो, त्यातील 70% थेट कचऱ्यात जातो. हे धागे पॉलिस्टर आणि अॅक्रेलिकसारखे सिंथेटिक प्लास्टिक पॉलिमरपासून बनवले जातात. त्यांचे विघटन होण्यासाठी 200 वर्षे लागू शकतात.

कपड्यांमधील सॅटिनसारखे सिंथेटिक फॅब्रिक्स हे वॉटर रिपेलेंट असतात. म्हणजे या कपड्यांच्या पृष्ठभागावर पाणी राहू शकत नाही. त्यामुळे हे कपडे धुण्यासाठी जास्त पाणी लागते. तर या कपड्यांना रंगरंगोटी करण्यासाठी वर्षभरात सुमारे 20 हजार टन पाणी वापरले जाते. रंगरंगोटीनंतर हे रसायनयुक्त पाणी थेट नदी-नाल्यांमध्ये सोडले जाते आणि यामुळे पाणी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते.

सस्टेनेबल फॅशनचा पर्याय  

सस्टेनेबल फॅशन म्हणजे ज्या कापडापासून पर्यावरणाला काहीही हानी पोहोचत नाही. फक्त कापडच नाही तर कपडे बनवण्याची प्रक्रिया, वापरण्याची पद्धतसुद्धा मानवी जीवन, वन्यजीवन तसेच पर्यावरण अशा नैसर्गिक घटकांना कुठल्याही प्रकारची हानी पोहोचवत नाही. याने कमीत कमी कचरा निर्मिती होते. भारतातील सस्टेनेबल फॅशन मार्केट अजूनही प्राथमिक टप्प्यात आहे, परंतु गेल्या काही वर्षांत त्यात स्थिर वाढ दिसून आली आहे. नकळतपणे कपडय़ांमुळे आणि कापडाच्या अनेक वस्तूंमुळे होणाऱ्या पर्यावरण प्रदूषणावर मात करण्यासाठी सस्टेनेबल फॅशनचा पर्याय योग्य ठरू शकतो. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये