…जमाना क्या कहेगा

मधुसूदन पतकी
‘‘छोड दो आँचल जमाना क्या कहेगा” एका गोड तक्रारीवर आधारित गाणं. खरंतर प्रियकराने काढलेली खोड. केलेली गंमत. हवीहवीशी. मात्र जग काय म्हणेल, लोकं काय म्हणतील हा सनातन प्रश्न. याचे उत्तर ही माहिती असतं. पण त्या उत्तराला सगळ्यांच्या समोर स्वीकारायचं नसतं. तिच्या मनात जे. तेच प्रियकराने करावं, असं वाटत असतं आणि तिला हव्या त्या कृतीला प्रियकराचा पाठिंबा असावा, असंही वाटत असतं. मात्र लोकलज्जेस्तव, समाजाच्या चालीरीतीमुळे हा चावटपणा (झकास शब्द) करू नको, असं सांगायचं. पण तो हवा-हवासा आहे. असं तिचं सांगणं. खोटंखोटं. खट्याळपणा. हा या गाण्यातला गोड गुणधर्म.त्यात देव आनंद आणि नूतन हे झिंग आणणारं चित्रमय रसायन. संपूर्ण गाण्यात गंमत एकच! या गाण्यात तिला ज्या जमान्यातील भीती वाटते त्यातली एकही व्यक्ती औषधाला सापडत नाही. बाग, रस्ता सुनसान. मग पदर धरला काय अन् सोडला काय? पण अशा तांत्रिक चुका इतक्या मधुर गाण्यात काढायच्या कशाला?

तर एक लटका प्रश्न ती’ विचारते. तू असा वेड्यासारखा वागलास तर लोकं काय म्हणतील? त्याचं उत्तर फार प्रामाणिक. वस्तुनिष्ठ. तो तिला सांगतो, सगळ्यांना हेच नि असंच आवडतं. आणि मग सुरू होतो त्या दोघांचा लाडिक संवाद.
ती त्याला शहाण्या मुलासारखा वागायला सांगते. तसं नाही लागला तर निघून जाईन असं दटावते. खरंतर ही ढगाळ हवा आणि तू दोघं वेड्यासारखं वागतात. वेडे झालाय. तू कितीही थांबवायचं ठरवलंस तरी मी नाही आता इथं थांबणार. तो मिष्कीलपणे म्हणतो, माझं सोड गं पण या झकास, मस्त पडलेल्या हवेचं ऐकशील का. आपल्या भावभावनांचे ऐकशील का? ना वेगळेपणाचा जमाना दिशांना असतो. ती मान्य करते, त्यामुळेच माझी चलबिचल होते रे..! त्यामुळे मी नव्याने तुझी होते. हसत तो विचारतो, मग का थांबली आहेस. का रोखतेस स्वतःला? हो धुंद, वेडी. हेच ते दिवस आहेत. याच त्या अदा आहेत ज्या जमान्याला आवडतात.

शेवटच्या कडव्यात या दोघांना पाहायला पाऊसही का बरं यावा? दोघे चिंब होतात. पावसाने देह नाही मनही शहारते. अधीर होतं. ती त्याला विनवते. मी या क्षणांनी वाहावत गेले तर… तर मला आवर. सावर. हात धरशील माझा. अगं ही मौजमजा एक बहाणा आहे. खरंतर आपण वेगळे कुठं आहोत. आपल्यात द्वैत कुठंय? आपलं मन, मन अगदी श्वासही एक आहेत. हात तर हातात आहेच, पण तू तर थेट माझ्या मनात, हृदयात आहेस. आपण एक झालो आहोत. आपण करतो त्यांनाही, जगालाही तेच करायचं असतं. मनातल्या भावना व्यक्त करणारं. पेईंग गेस्ट या चित्रपटातलं हे गाणं. चित्रपटात देवानंद आणि नूतन यांचा सहजसुंदर अभिनय. त्यांची जमलेली केमिस्ट्री. त्यानंतर आशा-किशोरची जबरदस्त सांगीतिक अदाकारी. मेलडी आणि सिम्पनी या दोन्ही हातात हात घालूनच वाटचाल करतात. लडीवाळपणे. सचिन देव बर्मन यांचे संगीत. त्यांच्या क्षमतांचे सप्तरंग आपल्याला रिझवणारे.

Nilam: