पाच राज्यांमध्ये निवडणुका कधी होणार? केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणुकीचा कार्यक्रम घोषित
नवी दिल्ली | Assembly Elections 2023 – पाच राज्यांमध्ये निवडणुका कधी होणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. तर आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission) पाच राज्यातील निवडणुकांचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. तर निवडणूक आयोगानं केलेल्या घोषणेनुसार छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. छत्तीसगडमध्ये 7 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबर या दिवशी मतदान होणार आहे. तर मध्यप्रदेशात 7 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. मिझोराममध्ये देखील 7 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तसंच तेलंगनात 13 नोव्हेंबर रोजी आणि राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे.
हा निवडणूक कार्यक्रम मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, अरूण गोयल, निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडेय यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला. तसंच या पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या 679 जागा असून पाचही राज्यांमध्ये 16.14 कोटी मतदार आहेत. यामध्ये 7.8 कोटी महिला, 8.2 कोटी पुरूष आणि 60.2 लाख नवोदित मतदार आहेत, तर ज्येष्ठ नागरिक, अपंग मतदार आदींना धरून मतदान करण्याची सुविधा देण्यात आल्याचंही, आयुक्त राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.
कोणत्या राज्यात किती जागा असणार?
विधानसभेच्या छत्तीसगडमध्ये 90 जागा असणार आहेत. मध्य प्रदेशमध्ये 230 जागा असणार आहेत. राजस्थानमध्ये 200 जागा असणार आहेत. तर मिझाराममध्ये एकून 40 जागा असणार आहेत आणि तेलंगनामध्ये एकूण 119 जागा असणार आहेत.