राष्ट्रवादी कोणाची? निवडणूक आयोगाकडून दोन्ही गटांना नोटीस
मुंबई | NCP Crisis – राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात फूट पडली असून, शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) असे दोन गट निर्माण झाले. आमचीच राष्ट्रवादी, असा दावा दोन्ही गटांकडून केला जात आहे. हा दावा दोन्ही गटांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केला आहे. आता शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठविली आहे.
पुढील तीन आठवड्यांमध्ये पक्षासंदर्भातील कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, दोन्ही गटांनी एकमेकांना ही कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, शरद पवार गटातील वरिष्ठ नेत्याने ही नोटीस आली असल्याचे मान्य केले.
“अजित पवार गटाने विधानसभेतील सर्वाधिक संख्याबळाच्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला, त्यावर उत्तर सादर करण्याबाबत नोटीस निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाली. त्यांच्या दाव्यावर उत्तर देण्याचे आणि संबंधित कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश आयोगाने दिले. ही एक प्रक्रिया आहे. आम्हीही निवडणूक आयोगाकडे यासंदर्भातील याचिका केली होती तेव्हा अजित पवार गटालाही निवडणूक आयोगाने अशी नोटीस पाठवली होती”, असे या वरिष्ठ नेत्याने सांगितले. दरम्यान, दोन्ही गट यांच्यातील पक्षांतर्गत वाद आता आयोगाकडे पोहोचला आहे.