संभाजी भिडेंविरोधात कारवाई का नाही? अधिवेशनात काँग्रेस आक्रमक
मुंबई | Sambhaji Bhide – महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते. पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत, असे खळबळजनक विधान श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी केले. गुरुवारी रात्री अमरावतीतील एका कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे शुक्रवारी अधिवेशनात चांगलाच वाद पेटला असल्याचे दिसले. यावेळी काँग्रेसचे नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
संभाजी भिडे कायम वाट्टेल ते बरळतात, इतिहासाची तोडफोड करून दोन समाजात तेढ निर्माण करतात. युवकांची माथी भडकवून अराजकता निर्माण करतात. मात्र सरकार त्यांच्यावर कोणतीच कारवाई करीत नाही, त्यांना पूर्णपणे मुभा देते. संभाजी भिडेंचे बोलविते धनी कोण? आणि त्यांना अभय कुणाचे? असे सवाल आमदार यशोमती ठाकूर यांनी केले.
संभाजी भिडे नावाचे हे गृहस्थ कायम वादग्रस्त वक्तव्य करून समाजात विष कालविण्याचे काम करतात. युवकांची माथी भडकवितात, परंतु राज्याचे गृहमंत्री त्यांच्यावर कोणतीच कारवाई करीत नाही, याचा अर्थ काय, असा प्रश्न करून आमदार ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, यापुढे जर संभाजी भिडे यांनी असे वक्तव्य केले तर त्यांना त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देण्यात येईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल.
संभाजी भिडे हे राष्ट्रपित्यावर टीकाटिप्पणी करतात. संपूर्ण देशासाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. सरकारने त्यांचा आजच बंदोबस्त करावा आणि त्याबाबत सभागृहात निवेदन करावे.
— बाळासाहेब थोरात, काँग्रेस नेते