‘…अशी कारवाई करणारा पहिला हिंदू असेल’; नारायण राणेंचा अजित पवारांवर निशाणा

मुंबई : केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. हिंदूंच्या मंदिरांवरील भोंगे उतरवणारे अजित पवार हे पहिले हिंदू असतील, हे आमचं दुर्दैव अशा शब्दांत नारायण राणे यांनी अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. भोंगे उतरवण्याच्या विरोधात अजित पवारांनी केलेल्या विधानावर राणेंनी ट्विटद्वारे भाष्य केलं आहे.
“उपमुख्यमंत्री अजित पवार जी म्हणाले आहेत की, शिर्डी मंदिरावरचा भोंगाही उतरवावा लागेल. हिंदू मंदिरावरील भोंगे, हरिनाम सप्ताह, जागरण-गोंधळ, काकड आरती यांवर कारवाई करून दाखवाच. अशी कारवाई करणारा पहिला हिंदू असेल, हे आमचे दुर्दैव!” अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली आहे.
दरम्यान, नुकत्याच येवल्यात झालेल्या सभेत बोलताना अजित पवार म्हणाले, “उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी असं केलं तसं केलं असं सांगत आहेत. पण माहिती घ्या त्यांनी काही भोंगे बंद केले त्यांनी केवळ मशीदींवरील भोंगे बंद केलेले नाहीत. तर मंदिरांवरील भोंगेही बंद केले आहेत. आपल्याकडे साईबाबांच्या मंदिरात शिर्डीत काकड आरती पहाटे ५ वाजता असते. सुप्रीम कोर्टानं माईक सहा वाजता सुरु करायला सांगितलाय. यावर कुणी ऑबजेक्शन घेतलं नाही. आपल्याकडं जागरण गोंधळ किती वाजता असतो रात्रीचं ना? गावागावांमध्ये हरिनाम सप्ताह कधी असतो? रात्रीचं असतो ना? विविध प्रकारचे कितीतरी कार्यक्रम उरुस, जत्रा आणि विरंगुळ्याचे कार्यक्रम रात्रीच होतात ना? जर यामध्ये कायदा-सुव्यवस्था धोक्यात येत नसेल तर उठसूठ पोलीस यामध्ये हस्तक्षेप करत नाहीत. याकडे आपण थोडसं दुर्लक्ष करतोच ना? मग असं असताना कशासाठी वातावरण खराब करण्याचं काम सुरु आहे?”