काँग्रेस होणार तरुण? चिंतन शिबिरात मोठा निर्णय…

नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये नेत्यांचं निवृत्तीचं वय निश्चित करण्यात यावं आणि निवृत्तीचं वय ६५ वर्षे असावं, अशी सूचना युथ काँग्रेसनं केली आहे. राजस्थनातील उदयपूर इथं सुरु असलेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरात ही सूचना करण्यात आली. महत्वाची बाब म्हणजे या सूचनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला आहे. पण २०२४ मधील लोकसभा निवडणुकीनंतर याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येईल, असं म्हटलं आहे.
दरम्यान, उदयपूरमध्ये तब्बल ९ वर्षांनंतर पुन्हा चिंतन शिबिर होत आहे. या शिबिराला ४३० काँग्रेस नेत्यांनी हजेरी लावली आहे. यावेळी काँग्रेसनं पक्षाचा सहा कलमी कार्यक्रम तयार केला असून तो हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे सुपूर्द केला आहे. राजकारण, संघटना, शेतकरी-कृषी, युवांचे प्रश्न, सामाजिक न्याय आणि कल्याण-आर्थिक असे विविध विषय हाताळण्यासाठी सहा कमिट्या तयार करण्यात आल्या आहेत. या कमिट्यांनी आपला कार्यक्रम सोनिया गांधींकडे सोपवला आहे.
त्याचबरोबर या बैठकीत हे देखील निश्चित करण्यात आलं की, संघटनेतील ५० टक्के उपलब्ध पदं तरुण नेत्यांना म्हणजेच ५० वर्षांखालील नेत्यांना देण्यात यावेत, याला सर्व वरिष्ठ नेत्यांनी सहमती दर्शवली आहे.