राज ठाकरेंसोबत युती करणार का? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “प्रस्ताव आला तर मी…”
मुंबई | Uddhav Thackeray – गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तसंच हे दोघं एकत्र येणार का याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. तर आता याबाबत स्वत: उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
उद्धव ठाकरे हे गुरूवारी (27 जुलै) खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या ‘आवाज कुणाचा’ या पॉडकास्टमध्ये बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबतच्या चर्चांवर भाष्य केलं. यावेळी ते म्हणाले की, “राज ठाकरे आणि मी एकत्र येणार आहोत या चर्चांना आधार असता तर माध्यमांमधील चर्चा थांबली नसती. आधी चर्चा झाली नंतर ती थांबली. तसंच ज्यानं ही चर्चा करण्याचा प्रयत्न केला त्याला आधार मिळाला म्हणून त्या चर्चा थांबल्या.”
पुढे जर युतीबाबतचा प्रस्ताव आला तर? असा प्रश्न संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना विचारला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, “मी प्रस्ताव आला-गेला यावर विचार करत नाही. जरी प्रस्ताव आला तरी मी विचार करत नाही आणि नाही आला तरी मी विचार करत नाही. कारण मी त्या क्षणाला काय असतं त्याबाबत विचार करतो. त्यामुळे यावर काहीही बोलण्याची आवश्यकता नाही.”