हिवाळ्यात या पदार्थांच्या सेवनाने वाढवा शरीरातील उष्णता
Winter Food : हिवाळा म्हणजे शीत हवामान. या दिवसात शरीरातील संतुलन राखण्यासाठी उष्ण गुणात्मक पदार्थांचा समावेश करणे गरजेचे असते. उष्ण गुणात्मक आहाराच्या सेवनाने शरीरातील अग्नी प्रदिप्त होतो. त्यामुळे भूक जास्त लागण्यास मदत होते शिवाय अन्नाचे सम्यक पचनही होते. या दिवसात सर्दी-पडसं, खोकला, ताप अशाच समस्या उद्भवत नाहीत तर रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे इतर गंभीर आजारही शरीराला विळखा घालतात. पण जर तुम्ही योग्य पदार्थांचा आहारात समावेश केला व यथायोग्य काळजी घेतली तर सर्दी-पडसंच काय तर इतर गंभीर आजारांपासूनही तुम्ही दूर राहू शकता.
साजूक तूप
हिवाळ्यात साजूक तूपाचे सेवन करणे अत्यंत आवश्यक व लाभदायक असते. तूप आपल्या शरीराचे तापमान व गरमी नियंत्रित करण्यासाठी मदत करते. कारण तूपात फॅटी अॅसिड असते. हिवाळ्यात तुपात तयार केलेले विविध प्रकारचे लाडू, हलवा, शिरा, उपमा असे पदार्थ खाणे लाभदायक ठरते. तुपात त्वरीत उर्जा निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे.
केसर
हिवाळ्याच्या दिवसात एक कप दुधात 4 ते 5 केसरच्या कांड्या उकळून प्यायल्याने सर्दीपासून सुटका होते. केशरमध्ये असलेले कॅरोटीनॉईड हे आपल्या शरिराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारू शकते. तसेच केसर त्वचेसाठी खूप फायदेशीर असते आणि याचा फेसपॅक लावल्यावर त्वचेवर गुलाबी रंग येतो आणि त्वचा चमकदार होते.
गुळ
गोड पदार्थ व कॅफिनयुक्त पेयांमध्ये गुळाचा वापर करुन त्याचे सेवन केले जाऊ शकते. गुळात भरपूर प्रमाणात कॅलरी असतात. साथीच्या रोगांपासून बचाव करण्यासाठी गुळ लाभदायक ठरतो. थंडीच्या दिवसांत शरिरातील रक्तप्रवाहाची गती मंदावते. ज्यामुळे रक्तदाबासारखे आजार उद्भवतात. ज्या लोकांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असते अशा लोकांनी गुळाचे सेवन करावे.
तीळ
थंडीमध्ये येणाऱ्या संक्रांतीमध्ये तीळ आणि गूळ खाण्याचेही विशेष महत्त्व आहे हे अनेकांना माहित असेल. थंड वातावरणापासून शरीराचे रक्षण व्हावे यासाठी तीळ-गूळ खाल्ले जातात. तीळ उष्ण असल्याने थंडीमध्ये शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. तीळ हिवाळ्यात शरीराला आतून गरम ठेवतात व कडाक्याच्या थंडीपासून आपला बचाव करतात.
दालचिनी
हिवाळ्यामध्ये खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये दालचिनी घातल्यास शरीराचे मेटाबॉलिज्म वाढते ज्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. दालचिनीमुळे तुमची डोकेदुखी आणि अंगदुखीदेखील कमी होण्यास मदत होते. जेव्हा स्किन ड्राय होते तेव्हा दालचिनी पावडर गुलाबजलमध्ये मिसळून त्वचेवर लावू शकता. दालचिनीचे पाणी प्यायल्याने खोकला व लठ्ठपणावर मात करता येते.
मोहरी
मोहरी हा मसाल्यातील एक पदार्थ आहे जो हिवाळ्यात आपल्या शरीराला उष्णता प्रदान करण्याचे काम करतो. सफेद व काळ्या रंगाच्या मोहरीमध्ये एलिल आइसोथियोसाइनेट नामक घटक आढळतो. जो आपल्या शरीराचं तापमान योग्य पद्धतीने वाढवते. थंडीच्या दिवसांत मोहरीच्या तेलाने शरीराला मसाज केल्याने रक्त प्रवाह, त्वचेचा पोत सुधारतो.
आलं
आलं हे फक्त चहाचा स्वाद वाढवण्यासाठीच उपयोगी नसून इतर गंभीर आजार दूर करण्यासाठी औषधांच्या स्वरुपात देखील वापरले जाते. आलं शरीरावर थर्मोजेनिक प्रभाव पाडते. ज्यामुळे शरीराला आतून गरमी मिळते. आल्यामुळे सर्दी-पडसं, खोकला व ताप यासारखे आजार दूर होतात. खवखवणा-या घशासाठी आलं रामबाण उपाय असते.