मधुसूदन पतकी
वह कौन थी. चित्रपट रहस्यमय. तत्कालीन चित्रपट रसिकांना धक्का देणारा. रहस्य हा आत्मा. चित्रपटाला आवश्यक तो सगळा मसाला रजत का पटावर. कथानकाबरोबर अतिशय सुंदर गाणी. दिलेलं सुमधुर संगीत. चित्रपटाला यश मिळण्याच्या सगळ्या सीमा पार! वह कौन थी साधना, मनोजकुमार यांच्याबरोबर लक्षात राहतात ती राजा मेहदी अली खाँ यांची गीतं. नेहमीप्रमाणे लताच्या गायकीचा नितांतसुंदर वापर करणारे संगीत दिग्दर्शक मदन मोहन यांचं संगीत.
भावनांना वाट करून द्यायचं शब्द हे साधन. ते साधन भावनांची उत्कटता साध्य व्हावी म्हणून. पण काही गाणी अशी असतात तिथं शब्द हे साधन केवळ साधन म्हणून राहात नाही. ‘लग जा गले’ हे असंच शब्द आणि भाव यांच्या सीमारेषा अत्यंत अस्पष्ट, धूसर करणारं गाणं. विरहगीत. नायिका इथं त्याचा निरोप घेते. चित्रपटाच्या कथानकानुसार आणि उद्या काय घडेल याची खात्री नसते, या शाश्वत सत्याला अनुसरून अत्यंत भावनिक होत ती आपल्या भावना व्यक्त करते. एकदा प्रेमाने गळाभेट व्हावी, आलिंगन द्यावे एवढीच तिची इच्छा. कदाचित या जन्मात पुन्हा भेट तरी होईल की नाही याची माहितीसुद्धा नाही.
अशावेळी हे जे क्षण आहेत ते क्षण जपून ठेवायचे. त्या क्षणांवर अवघं आयुष्य व्यतीत करायचं एवढीच इच्छा. ही संधी पुन्हा मिळेल का? कळत नाही. ही रात्र संपली की, नवं काय घडेल? रात्रीच्या अंधारात उद्याच्या प्रारब्धाचे कोणते क्षण असतील? हे सांगता न येणं हे नक्की. मग आत्ता जे सांगता येतंय, अनुभवता येतं ते एकमेकांसाठीच. हे या क्षणाचं जवळ येणं कदाचित शेवटचं असेल आणि या क्षणात गळाभेट व्हावी एवढेच. त्या स्पर्शामुळे डोळ्यांतून आसवांच्या धारा सुरू होतील. प्रेमाचा उत्कट आविष्कार कदाचित या रात्री शेवटचाच असेल. कारण यानंतर डोळ्यांतून वाहण्यासाठी पाणी असेल? नसेल? राजा मेहदी अली खाँ यांनी अप्रतिम अशा शब्दांवर प्रतिभेचं जे गारुड केलं आहे ते अनुभवताना अगदी यातून तळातून आपण गलबलून जातो. हृदयावर आघात होतो, काळजाला जखम न भरून येणारी. निरोप तोही इतक्या संयत पद्धतीनं! प्रतिभेचा उत्कट आविष्कारच. खरंच ही रात्र अशीच कायम राहावी एवढेच…!