मोकाच्या गुन्ह्यातील आरोपी महिलेला अटक
मोकाच्या गुन्ह्यात मागील वर्षभरापासून पसार असलेल्या महिला आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. ती स्वतःहून न्यायालयात हजर झाली. त्यानंतर तिला पोलिसांनी ताब्यात घेतले.न्यायालयाने तिला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
लता रतन रोकडे (वय ४२, रा. चिखली) असे अटक केलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे.
सहायक पोलीस आयुक्त देविदास घेवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली येथे मे २०२३ मध्ये झालेल्या सोन्या तापकीर खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या करण रतन रोकडे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या टोळीतील त्याचा भाऊ ऋत्विक उर्फ मुंग्या रतन रोकडे आणि आई लता रतन रोकडे यांच्यासह टोळीतील इतर साथीदारांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी जुलै २०२३ मध्ये ‘मोकां’तर्गत कारवाई केली होती. तेव्हापासून लता रोकडे परागंदा होती.
दरम्यान, तिने अटक पूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने अर्ज फेटाळला. अखेर आरोपी महिला स्वतःहून न्यायालयात हजर झाली असता पोलिसांनी तिला १ ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले.