अटल सेतुवरून महिलेला वाचवले
अटल सेतूच्या रेलिंगला लटकलेल्या ५६ वर्षीय महिलेला न्हावा-शेवा वाहतूक शाखेतील अंमलदारानी वाचवले. देवाचे फोटो खाडीमध्ये टाकताना तोल गेल्याची माहिती महिलेने दिली आहे.
मुलुंड येथे राहणारी ५६ वर्षीय महिला शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास मुंबईकडून शेलगर टोल नाक्याकडे जात होती. महिलेने कारचालकाला अटल सेतूवर थांबण्यास सांगताना रेलिंगवर चढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचा तोल गेल्याने कॅब चालक संजय द्वारका यादव (३१) याने तिला वेळीच पकडले. ब्रिजच्या रेलिंगला लटकून राहिलेली महिला अटल सेतू टोल नाक्यावरील सीसीटीव्हीच्या कमांड सेंटरमधील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर न्हावा-शेवा वाहतूक शाखेतील अंमलदाराना याची माहिती देण्यात आली. यावेळी पेट्रोलिंग करणाऱ्या वाहनावर कार्यरत असलेले पोलिस नाईक ललित शिरसाट, किरण मात्रे व पोलिस शिपाई यश सोनवणे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत स्वतःचा जीव धोक्यात घालून महिलेला सुरक्षितपणे बाहेर काढले.