प्रथमच थरार रंगणार महिला क्रिकेटचा

नवी दिल्ली : बर्मिंगहॅम (इंंग्लंड) येथे २८ जुलै ते ८ ऑगस्टदरम्यान होणार्या राष्ट्रकुल (कॉमनवेल्थ गेम्स) क्रीडा स्पर्धेमध्ये प्रथमच महिला क्रिकेटचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय ऑलिम्पिक महासंघाने २१५ खेळाडूंसह ३२२ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. यामध्ये १०७ अधिकारी आणि सपोर्ट स्टाफचा समावेश आहे. गोल्ड कोस्ट येथे झालेल्या गेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या मागे तिसरे स्थान पटकावले होते आणि यावेळी संघ आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल. ऑलिम्पिक पदकविजेते नीरज चोप्रा, पी. व्ही. सिंधू, मीराबाई चानू, लोव्हलिना बोरगोहेन, बजरंग पुनिया आणि रविकुमार दहिया यांचा समावेश संघात आहे.
याशिवाय, विद्यमान राष्ट्रकुल चॅम्पियन मनिका बत्रा, विनेश फोगट, तसेच २०१८ आशियाई क्रीडा स्पर्धेतील हिमा दास आणि अमित पंघल हेदेखील या दलात आहेत. भारतीय बॉक्सिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष राजेश भंडारी हे संघाचे पथकप्रमुख (चीफ डी मिशन) आहेत. भारतीय खेळाडू १५ खेळांमध्ये आणि चार पॅरास्पोर्ट्समध्ये. बॉक्सिंग, बॅडमिंटन, हॉकी, वेटलिफ्टिंग, महिला क्रिकेट आणि कुस्ती यांसारख्या पारंपरिकदृष्ठ्या मजबूत खेळांमध्ये संघाने चांगली कामगिरी करणे अपेक्षित आहे. महिला क्रिकेट (टी-२० फॉरमॅट) प्रथमच या खेळांचा भाग बनला आहे. काही भारतीय खेळाडू आधीच बर्मिंगहॅमला पोहोचले आहेत, तर काही जागतिक स्पर्धांमध्ये भाग घेतल्यानंतर थेट तेथे पोहोचतील. उर्वरित खेळाडू नवी दिल्लीहून रवाना होतील. कॉमनवेल्थ गेम्स व्हिलेज अधिकृतपणे २३ जुलैला दलांसाठी खुले होईल. भारतीय तुकडी पाच वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम करणार आहे.