संगमवाडी ते टिंगरेनगर रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात

पुणे : पूर्वीचा प्रभाग क्रमांक २ व सध्याचा प्रभाग क्रमांक ८ मधील पुणे शहर विकास आराखड्यातील संगमवाडी ते टिंगरेनगर या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी त्यासाठी पाठपुरावा केला. आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते नुकतेच रस्त्याच्या कामाचे पूजन करण्यात आले.
यावेळी महापालिकेच्या पथ विभागाचे अधिकारी व्ही. जी. कुलकर्णी, अमर मतीकुंड, पाडाळे, भूमी जिंदगीचे राजेंद्र मुठे, येरवडा, कळस, धानोरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त वैभव कडलक, शाळेचे ट्रस्टी विकास गुप्ता, भाजप प्रवक्ते मंगेश गोळे, माजी नगरसेवक भगवान जाधव व सुभाष चव्हाण या वेळी उपस्थित होते. संबंधित रस्त्याचे काम करताना अग्रेसन शाळा येथील जागा ताब्यात येणे बाकी होते. तेही काम पूर्ण झाले असल्याची माहिती माजी उपमहापौर डॉ. धेंडे यांनी दिली. अग्रसेन शाळेने जागा ताब्यात देणेकरिता रस्त्यात येणार्या वर्गखोल्या काढून सुरक्षा भिंत बांधून घेतली आहे. त्याची देखील पाहणी उपस्थितांनी केली. या प्रसंगी आयुक्त विक्रम कुमार यांनी भूमिपूजन करून या विकास आराखड्यामधील रस्ता पुढील पंधरा दिवसांत नागरिकांना रहदारीकरिता खुला होईल, असे सांगितले.