“तेव्हा भारताचा पराभव केला होता, आताही…”; पाक कर्णधारानं डिवचलं, सामन्यापुर्वीच वातावरण तापलं..
पाक कर्णधार नेमकं काय बोलला, ज्यामुळे प्रत्येक भारतीयांचा पारा चढला?
अहमदाबाद : (World Cup 2023 India Vs Pakistan) शनिवारी होणाऱ्या महामुकाबल्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने मोठं वक्तव्य केले आहे. विश्वचषकात शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये लढत होणार आहे. या लढतीपूर्वी बाबर आझम याने आम्ही भारताचा पराभूत करु शकतो, असे वक्तव्य केले आहे. टी 20 विश्वचषक 2021 मध्ये आम्ही भारताचा पराभव केला होता. आताही भारताला हरवू शकतो. भूतकाळात काय झाले, हे महत्वाचं नाही, असे बाबर आझम याने म्हटले आहे.
बाबर आझम म्हणाला की, फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये आम्ही एक टीम म्हणून सर्वश्रेष्ठ कामगिरी करणं आमच्यासाठी महत्वाचं आहे. या परिस्थितीत गोलंदाजाकडून चूक होण्याची शक्यता कमीच आहे. अनुभव तुम्हाला अधिक चांगलं होण्यास मदत करतो. 2021 च्या टी 20 विश्वचषकात आम्ही भारताचा पराभव केला आहे. मला वाटतेय की, आताही आम्ही असेच करु शकतो.
आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यात बाबर आझम याला मोठी खेळी करता आली नाही. दोन्ही सामन्यात बाबर आझम याला फक्त 15 धावा करता आल्या आहेत. त्याबाबत बोलताना बाबर म्हणाला की, ‘विश्वचषकात आतापर्यंत माझ्या बॅटमधून जास्त धावा निघाल्या नाहीत. यामध्ये बदल होईल, अशी मला अपेक्षा आहे. जर तुम्हाला विश्वचषकात चांगली कामगिरी करायची असेल तर फिल्डिंग चांगली असायला हवी. आम्ही त्यावर काम करत आहोत. ‘
बाबर आझम म्हणाला की, भूतकाळात काय झाले, ते महत्वाचे नाही. आम्ही वर्तमानकाळात कसे आहोत, हे महत्वाचे आहे. आम्ही विश्वचषकात चांगली कामगिरी करु. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रोमांचक होईल. चाहते मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यांच्यापुढे हिरो होण्याची संधी आहे.