क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

भारताची सेमीफायनल लढत कोणाविरुद्ध? ‘या’ 2 संघासह पाकिस्तानही शर्यतीत..

World Cup 2023 : रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली विश्वचषक खेळणाऱ्या टीम इंडियाचा विजय रथ आतापर्यंत कोणालाही रोखता आलेला नाही. भारताने खेळलेल्या ७ पैकी ७ लढतीत विजय संपादन केला आहे. वर्ल्डकप २०२३ च्या सेमीफायनलमध्ये पोहोचणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. टीम इंडिया १४ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. मात्र, भारताची सेमीफायनल लढत कोणासोबत होणार याकडे संपुर्ण क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

आयसीसीच्या नियमानुसार, सेमीफायनलमध्ये पहिल्या स्थानावर असलेल्या संघाची लढत चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघासोबत होत असते. तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघाची लढत तिसऱ्या स्थानावर असेल्या संघासोबत होईल.
टीम इंडियाची कामगिरी ज्या पद्धतीने होत आहे ते पाहता भारत गुणतक्त्यात अव्वल स्थानी राहण्याची शक्यता सर्वाधिक आहे. असे झाले तर चौथ्या क्रमांकावर असलेला संघ भारताविरुद्ध सेमीफायनल खेळले. सध्या चौथ्या स्थानासाठी ३ संघांमध्ये लढत सुरू आहे. यामध्ये न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे.

सर्वाधिक संधी न्यूझीलंडला आहे, कारण त्यांचे नेट रनरेट चांगले आहे. सध्या त्यांची लढत बेंगळुरू येथे पाकिस्तानविरुद्ध सुरू असून प्रथम फलंदाजी करताना त्यांनी ४०१ धावांचा डोंगर उभा केलाय. जर या लढतीत पाकिस्तानचा पराभव झाला तर ते वर्ल्डकपमधून बाहेर होतील. जर पाकिस्तानचा विजय झाला तरी त्यांच्या पुढील लढती इंग्लंड विरुद्ध आहे. तर न्यूझीलंडची लढत श्रीलंकेविरुद्ध आहे. या दोन्ही संघांनी पुढील मॅच जिंकल्या तर प्रत्येकी १० गुण होतील आणि नेट रनरेटवर सर्व काही ठरेल. ज्यात न्यूझीलंडला फायदा होऊ शकतो. पाकिस्तानला न्यूझीलंडच्या पुढे जायचे असेल तर इंग्लंडविरुद्ध मोठा विजय मिळवावा लागले. त्यांचा फॉम पाहता ही गोष्ट थोडी अवघड वाटते.

अफगाणिस्तानच्या अशा पल्लवीत
या स्पर्धेत सर्वाधिक चर्चा कोणत्या संघाची झाली असेल तर ती अफगाणिस्तानची होय. आता तर त्यांना सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची संधी आहे. ७ पैकी ४ लढतीत त्यांनी विजय मिळून गुणतक्त्यात ५ वे स्थान मिळवले आहे. तर उर्वरीत दोन लढती जिंकल्या तर ते चौथ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडला टक्कर देऊ शकतील. पण ही गोष्ट थोडी कठीण आहे, कारण त्यांच्या पुढील लढती ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. या दोन्ही संघांविरुद्ध विजय मिळवणे अफगाणिस्तानसाठी कठीण असेल. अर्थात क्रिकेटमध्ये काहीही अशक्य नाही. कारण याच स्पर्धेत त्यांनी इंग्लंड आणि पाकिस्तानचा पराभव केलाय.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये