बाजीरावचा डायलॉग क्रिकेटच्या मैदानावर! चीते की चाल, बाज की नजर और विराट की बॅटिंगपर संदेह नही करते!
World Cup Final 2023 : चीते की चाल,बाज की नजर और बाजीराव की तलवार पर संदेह नही करते, हा बाजीराव मस्तानी सिनेमातला डायलॉग, जर क्रिकेटच्या मैदानात उतरवायचा झाला, तर चीते की चाल,बाज की नजर और विराट की बॅटिंग पर संदेह नही करते असंच म्हणावं लागेल.
हिऱ्याच्या चकाकीची, सोन्याच्या झळाळीची, वाऱ्याच्या वेगाची, समुद्राच्या उधाणाची… जी जी विशेषणं असतील ती ती सर्व ज्याच्या बॅटिंगसमोर (Batting) फिकी पडतात, तो किंग अर्थात विराट कोहली (Virat Kohli).. तो बॅटिंगचा बादशाह आहे, फिटनेसचा बाप आहे, फिल्डिंगचा राजा आहे.. मोठमोठे विक्रम त्याच्या पायावर लोटांगण घालतात, भलेभले गोलंदाज (Bowler) त्याच्यासमोर हात टेकतात तोच विराट प्रेम कोहली.
अर्धशतकांचं शतक झळकावून विराट कोहलीने आपल्या मुकुटात आणखी एक मणी गोंदलाय. विराट कोहली हे नाव क्रिकेट विश्वात माहिती नाही असं होणं शक्य नाही. धावांचा पाऊस पाडणारा आणि अनेक तरुणींच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या भारतीय क्रिकेट संघातील एक खेळाडू आहे. त्याच्या खेळीने त्याने आतापर्यंत भारतीयांची अनेकदा मनं जिंकली आहे.
न्यूझीलंडवर (New Zeeland) मात करत भारताने विश्वचषक 2023 (WorldCup 2023) च्या स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला आणि भारताचा (India) विश्वचषकाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचं पाऊल पडलं. पण त्या दिवशी एक विराट विक्रम भारतीयांनी ह्याची देही ह्याची डोळा पाहिला. वानखेडेच्या मैदानावर क्रिकेटच्या देवाचा विक्रम मोडित काढत विराट कोहली या वादळाने भारतीयांच्या माना अभिमानाने उंचावल्या.