World Cup Final 2023: थरारक सामना पाहण्यासाठी, मोदी स्टेडियमवर स्वत: पंतप्रधानांची हजेरी
अहमदाबाद : (World Cup Final 2023) टीम इंडियाने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करत विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यात मोहम्मद शमीने शानदार गोलंदाजी करत सात विकेट्स घेतल्या. फायनलचा महामुकाबला 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना पाहण्यासाठी पीएम मोदी स्वत: उपस्थित राहणार आहेत. दैनिक जागरणने याबाबत वृत्त दिलं आहे.
दरम्यान, न्यूझीलंडविरुद्ध सात विकेट घेत टीम इंडियाची फायनल निश्चित केलेल्या मोहम्मद शमीच्या गोलंदाजीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप कौतुक केले आहे. त्यांनी ट्विट करून शमीवर कौतुकाचा वर्षाव केला. ते म्हणाले की, आजची उपांत्य फेरी अधिक खास बनली ती चमकदार वैयक्तिक कामगिरीमुळे. मोहम्मद शमीची शानदार गोलंदाजी क्रिकेटप्रेमींच्या भावी पिढ्यांच्या स्मरणात राहील. शमी छान खेळला!
यंदाच्या विश्वचषकात शमीने सहा सामन्यांत 23 बळी घेतले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.