ताज्या बातम्यादेश - विदेश

“राष्ट्रपतीपदाची निवडणूक दोन उमेदवारांमध्ये नाही तर ती दोन विचारसरणींमधील लढाई”

नवी दिल्ली | Yashwant Sinha Appeals For Votes – सध्या देशात होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांनी उभे केलेले उमेदवार यशवंत सिन्हा यांनी रविवारी सर्व राजकीय पक्षांना निवडणुकीत त्यांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या विरोधात यशवंत सिन्हा रिंगणात उतरले आहेत. तसंच सिन्हा यांनी मतदानासाठी आवाहन करताना म्हटलं आहे की, ”यावेळी राष्ट्रपतीपदाची निवडणूक दोन उमेदवारांमध्ये नाही, तर ती दोन विचारसरणींमधील लढाई आहे.”

यावेळी यशवंत सिन्हा म्हणाले, “मी भारताच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी या निवडणुकीत उभा आहे, तर द्रौपदी मुर्मू यांना लोकशाहीवर दररोज हल्ले करणाऱ्यांचा पाठिंबा आहे. मी धर्मनिरपेक्षतेच्या रक्षणासाठी उभा आहे, जो आमच्या राज्यघटनेचा प्रस्तावना स्तंभ आहे. माझा प्रतिस्पर्धी उमेदवार अशा पक्षाचा आहे, ज्याने हा स्तंभ नष्ट करण्याचा आणि बहुमताचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा संकल्प केला आहे.”

“मी सहमती आणि सहकार्याच्या राजकारणाला प्रोत्साहन देण्यासाठी उभा आहे. माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला संघर्ष आणि संघर्षाचे राजकारण करणाऱ्या पक्षाचा पाठिंबा आहे. एक राष्ट्र, एक पक्ष, एक सर्वोच्च नेता. हे थांबवायला नको का? फक्त तुम्हीच हे थांबवू शकता,” असंही सिन्हा म्हणाले. तसंच शनिवारी त्यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करून सर्व आमदार आणि खासदारांना त्यांच्या बुद्धीनुसार मतदान करण्याचं आवाहन केलं होतं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये