मैत्रिणीला सोशल मीडियावर मेसेज पाठविल्याने टोळक्याने केला तरुणावर प्राणघातक हल्ला
पुणे | पुण्यात गुन्हेगारीचे (Pune Crime News) प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यात तरुणाईचा आकडा मोठ्या प्रमाणावर आहे. अशातच हडपसरमध्ये (Hadapasar) मैत्रिणीला सोशल मीडियावर मेसेज पाठविल्याने जाब विचारणाऱ्या तरुणावर टोळक्याने तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना घडली आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमर बसवराज जमादार (वय 20), अमन अशोक नरोटे (वय 19), श्रीपती संतोष सरोदे (वय 19) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अमोल राजाराम घाटे (वय 25) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत घाटे याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपींनी घाटे याच्या मैत्रिणीला मेसेज पाठविला होता. घाटे आणि त्याचा मावस भाऊ सुदर्शन दासवड जेवण करुन रात्री निघाले होते. हडपसर भागातील माळवाडी परिसरात आरोपी जमादार, सरोदे, नरोटे आणि साथीदार थांबले होते. मैत्रिणीच्या मोबाइलवर संदेश का पाठविला, अशी विचारणा घाटेने आरोपींकडे केली. त्यानंतर आरोपींनी घाटेला शिवीगाळ करुन त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. भांडणात मध्यस्थी करणाऱ्या दासवड याच्यावर वार करुन आरोपी पसार झाले. पसार झालेल्या दोघांना पोलिसांनी पकडले असून, साथीदारांचा शोध धेण्यात येत आहे.