पुणे : (Young Woman Sena bearer Sharmila yevle Resign) पाच महिन्यापूर्वी शिवसेनेविरोधात बंडखोरी करुन एकनाथ शिंदेंनी सेनेच्या ४० आमदारांना सोबत घेऊन भाजपच्या मदतीने, राज्यात नवं सरकार स्थापन केलं. त्यानंतर रोजच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळील अनेक शिवसैनिक शिंदे गटात सामील होत आहेत. त्यात कमी म्हणून की, काय शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. पुण्यातील युवती सेनेच्या सहसचिव शर्मिला येवले यांच्यासह ३६ युवती पदाधिकाऱ्यांनी अंतर्गत वादामुळे आम्ही राजीनामा देत असल्याच पत्रकार परिषद घेत जाहीर केले आहे.
एकाच वेळी युवती सेनेकडून राजीनामा देत असल्याचे जाहीर केले असल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या राजीनाम्याबाबत शर्मिला येवले म्हणाल्या की, मागील दोन वर्षांपासून शिवसेनेच्या युवती राज्यभरात अनेक आंदोलन, निवडणुकांमध्ये काम करीत आहे. मात्र प्रत्येक वेळी युवती सेनेमधील वरीष्ठ पदाधिकाऱ्यांकडून आम्हाला चांगल्या प्रकारे वागणूक दिली गेली नाही. आंदोलन घेतले तर प्रसार माध्यमांशी का प्रतिक्रिया दिली. प्रसार माध्यमांशी संवाद साधू नका असं अनेक वेळा सांगण्यात आलं.
आम्ही वारंवार सांगितलं की, आपला पक्ष,आपली काम याच माध्यमामधुन आपण नागरिकांपर्यंत पोहोचू शकतो. हि बाब वरीष्ठांना सांगून देखील आम्हाला सतत कोणतीही भूमिका मांडू दिली गेली नाही. त्यामुळं आम्ही अखेर सर्व ३६ युवती पदाधिकारी राजीनामे देत आहोत. मात्र, आम्ही कार्यकर्ती म्हणून काम करत राहणार आहे. आम्ही कोणत्याही इतर पक्षात जाणार नाही. या सर्व घडामोडी घडत असताना आमच्या कामाची आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांनी कौतुक देखील केले. पण पक्षातील वरीष्ठ मंडळीकडून चूकीची वागणूक देत असल्याने आमच्या पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितलं.