नाशिक | नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मानस पगार यांचं अपघाती निधन झालं आहे. बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात मानस पगार यांचं निधन झालं. मानस पगार हे नाशिक जिल्ह्यातील लोकप्रिय तरुण नेतृत्व होते. राजकारणातील तरुण चेहरा म्हणून ते नावारुपाला येत होते. मात्र, अशातच अचानक झालेल्या अपघातामुळे मानस पगार यांचं निधन झालं. त्यांच्या निधनामुळे नाशिक जिल्ह्याने एक अभ्यासू आणि धाडसी व्यक्तिमत्व गमावले आहे. एका उमद्या आणि तरुण नेत्याला मुकल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. मानस पगार यांच्या पार्थिवावर आज सकाळी पिंपळगाव बसवंत या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
युवक काँग्रेसच्या सुपर 1000 मुख्यपदी निवड
2020 साली युवक काँग्रेसच्या सुपर 1000 मुख्यपदी मानस यांची निवड झाली होती. त्यावेळी काँग्रेसने सुपर 1000 ही मोहीम हाती घेतली होती. हे युवा जोडो अभियान होतं. या मोहिमेंअतर्गत तरुणांना काँग्रेसशी जोडून घेण्यात येत होतं. त्याच्या मुख्य समन्वयकपदाची सूत्रे मानस यांच्याकडे सोपवण्यात आली होती.
रावसाहेब दानवेंच्या घरासमोर आंदोलन
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरले होते. त्यामुळे मानस पगार यांनी रावसाहेब दानवे यांच्या घरासमोरच तीव्र आंदोलन केलं होतं. ज्यावेळी मानस यांनी दानवे यांच्या घरासमोर उपोषण केलं होतं त्यावेळी मानस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली होती.