काकाचा मोबाईल हॅक करून खाजगी व्हिडीओ पाहायचा; 37 वर्षीय पुतण्याचे अजब कारस्थान
नाशिक | इंटरनेटवरील सार्वजनिक आणि वैयक्तीक ‘डाटा’ चोरीचे प्रमाण सध्या बऱ्यापैकी वाढले आहे. अशातच नाशिकमध्ये एक विचित्र प्रकार घडला आहे. पुतण्यानेच आपल्या काकाचा मोबाईल हॅक करून त्यातील खाजगी व्हिडीओ पाहण्याचा प्रयत्न केला आहे.
गावाकडे राहणाऱ्या काकांनी पुतण्याच्या मदतीने मोबाइलमध्ये ई-मेल सुरू केला. त्यानंतर पुतण्याने काकाच्या मोबाइलमध्ये स्वत:चा मोबाइल क्रमांक ‘ई-मेल’ला जोडून दोन मोबाइल हॅक केल्याने सायबर पोलिसांत पुतण्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक सुभाषचंद्र कुलकर्णी (वय 37) असे संशयिताचे नाव आहे.
उमेश मधुसुदन कुलकर्णी (वय 56) यांनी नाशिक सायबर पोलिसांत फिर्याद दिली आहे. उमेश हे चाळीसगावात पौराहित्य करतात. त्यांचा पुतण्या दीपक याने 13 ऑगस्ट 2023 रोजी उमेश यांचे दोन मोबाइल हॅक केले. उमेश यांच्या मोबाइलमधील संपर्क क्रमांकासह वैयक्तिक छायाचित्रे, व्हिडीओ आणि इतर महत्त्वाचा डेटा डिलिट केला. त्यावरून उमेश यांनी पुतण्याविरोधात फिर्याद दिली.
नेमकं प्रकरण काय ?
उमेश यांच्या मोबाइलमध्ये काही महिन्यांपूर्वी ई-मेल खाते सुरू करायचे होते. त्यावेळी त्यांनी पुतण्याची मदत घेतली. पुतण्याने काकांना ई-मेल सुरू करून देतांना तिथे ‘टू-स्टेप व्हिरिफिकेशन’मध्ये स्वत:चा मोबाइल क्रमांक नोंदविला. त्यामुळे एका प्रकारे काकाच्या मोबाइलचा ‘अॅक्सेस’ ई-मेलच्या माध्यमातून पुतण्याकडेही राहिला. फिर्यादी हे त्यांच्या मोबाइलमध्ये संपर्क क्रमांक, फोटो, व्हिडीओ किंवा इतर डेटा संकलित करीत होते. या संपूर्ण डेटाचा ‘बॅकअप’ ई-मेल ड्राइव्हवर सेव्ह होत राहिला. हा डेटा पुतण्या स्वत:च्या क्रमांकावरून ई-मेल उघडून नाशिकमध्ये बघायचा. त्याने ऑगस्ट महिन्यात अचानक काकांच्या दोन्ही मोबाइलमधील डेटा ई-मेलच्या माध्यमातून डिलिट केला. ही बाब फिर्यादीच्या लक्षात आल्यावर त्यांनी सायबर पोलिसांत फिर्याद दाखल केली.