“रामदास कदमांचा विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी लाळघोटेपणा”; पेडणेकरांचा हल्लाबोल

मुंबई : (Kishori Padnekar On Ramdas Kadam) शिवसेनेच्या उपनेत्या आणि मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. रामदास कदम यांनी काल ठाकरे परिवारावर टीका केली होती, त्याला आज पेडणेकरांकडून प्रत्युत्तर देण्यात आलं.
दरम्यान त्या म्हणाल्या, रामदास कदम पातळी सोडून बोलतायत हे महाराष्ट्र आणि मुंबईला कळलेलं आहे, असं पेडणेकर म्हणाल्या. किशोरी पेडणेकर यांनी रामदास कदम यांची विधानपरिषदेतील व्हिडिओ क्लिप दाखवली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रामदास कदम यांच्यामुळं शिवसेना सोडल्याचं खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमात सांगितलं होतं, त्याचा व्हिडिओ देखील त्यांनी माध्यमांना दाखवला.
देवेंद्र फडणवीस यांनी रामदास कदम यांच्यावर केलेल्या टीकेचा व्हिडिओ किशोरी पेडणेकर यांनी ऐकवून दाखवत हल्लाबोल केला. १९९७-९८ पासून रामदास कदम यांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न होता. मात्र, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी त्यांना पद दिली. कदम यांच्या मुलाला आमदार केलं. विधानपरिषदेच्या १२ आमदारांमध्ये आमदारकी मिळावी म्हणून रामदास कदम लाळघोटेपणा करत असल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला.