आदित्य ठाकरेंनी मनसेला भाजपाची सी टीम म्हटल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले…

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात बोलताना हिंदुत्वावर आक्रमक भूमिका मांडताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करताना उत्तर प्रदेशमध्ये विकास झाल्याचं म्हटलं. यानंतर भाजपा नेत्यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्यशी सहमती दर्शवली तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावरुन टीका केली. तसंच शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसे ही भाजपाची सी टीम असल्याची टीका केली होती. यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

“आमचं हिंदुत्व वचनं पूर्ण करण्याचं आणि सेवा करण्याचं आहे. मनसेला मी टाइमपास टोळी म्हणायचो कारण ते टाइमपासच करायचे. पण आता मला बरं वाटतंय की भाजपाची सी टीम म्हणून त्यांना थोडं काम मिळालं आहे. बी टीम एमआयएम आहे आणि सी टीम मनसे आहे,” असं आदित्य ठाकरे म्हणाले होते.

आदित्य ठाकरेंच्या या टीकेबद्दल देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आलं असता ते म्हणाले शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादीची कितवी टीम आहे? अशी विचारणा केली. “माझा शिवसेनेला सवाल आहे की तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीची कितवी टीम आहात. सी, बी, डी की झेड आहात. एक मुख्यमंत्रीपद घेऊन संपूर्ण पक्षाची काय अवस्था केली आहे. आधी आपलं पहा. आपलं ठेवायचा झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून हे जरा बंद करा”, असा टोला फडणवीसांनी लगावला.

Sumitra nalawade: