ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत
पुणे : एकीकडे पेट्रोल व डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत, तर दुचाकी, चारचाकी ई-वाहनांसाठी खरेदीमध्ये मोठी सवलत मिळत असून इलेक्ट्रिक चार्जिंगद्वारे स्वस्त इंधनदेखील उपलब्ध होत आहे. त्यामुळे ई-वाहनांचा वापर ही काळाची गरज झाली आहे, असे मत राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केले.
महावितरणकडून राज्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ५० नवीन ईव्ही चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येत आहेत. त्यापैकी पूर्णत्वास गेलेल्या बाणेर येथील पहिल्या ई-व्ही चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर महावितरणचे संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे, कार्यकारी संचालक (प्र.) किशोर परदेशी, पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे, कार्यकारी संचालक संजय मारुडकर (महानिर्मिती), मुख्य अभियंता सचिन तालेवार, चंद्रमणी मिश्रा यांची उपस्थिती होती. मराविमं सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तमराव झाल्टे, सौ. सुमेधा नितीन राऊत यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. राऊत म्हणाले की, इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांसाठी प्रतिकिलोमीटर १ रुपया ७० पैसे, तर दुचाकी ई-वाहनांसाठी प्रतिकिलोमीटर केवळ ८५ पैसे खर्च येईल. सोबतच केवळ बॅटरी बदलण्याखेरीज इतर देखभाल व दुरुस्तीचा नियमित खर्च नसल्याने सद्यःस्थितीत ई-वाहनांचा वापर ही काळाची गरज झालेली आहे.