कोणतीही आयडिया त्वरित अमलात आणा : स्वप्नील

आपण दररोज एका व्यावसायिकाची दखल स्टार्टअपच्या माध्यमातून घेतो. गरीब, मध्यमवर्गीय होतकरू तरुणांची यशोगाथा, शून्यातून एक यशस्वी स्टार्टअप किंवा व्यवसाय करण्यापर्यंतचा प्रवास आपण बघतो. आजही एका तरुणाच्या स्टार्टअपचा प्रवास आपण बघणार आहोत. स्वप्नील मारकड, टेक्निकल सिक्युरिटी सर्व्हिसेसचा मालक. आता वय तेवीस वर्षे. पुण्यात पदवी शिक्षणासाठी आला होता. पदवीनंतर शिक्षण थांबवून स्वतः नवीन स्टार्टअप सुरू केला तो लोकांच्या घरांना, ऑफिसांना, सोसायट्यांना, बँकांना, मोठमोठ्या कंपन्यांना सीसीटीव्ही (CCTV) सेवा पुरवायचा. सध्या भरपूर ग्राहक त्याच्या ‘टेक्निकल सिक्युरिटी सर्व्हिसेस’शी जोडले गेले आहेत. त्याचा इथपर्यंतचा प्रवास असावा तेवढा सोपा नव्हता.


बहुतेक विद्यार्थी नोकरीसाठी शिकतात, पण काहींना शिकण्यासाठीच नोकरी करावी लागते. स्वप्नील त्यापैकीच एक. शिकत नोकरी आणि नोकरी करीत शिक्षण अशीच त्याची पदवीची तीन वर्षे संपली. सुरुवातीला एका खासगी कंपनीत नोकरी केली. त्यानंतर CCTV संबंधित एक कोर्स पूर्ण केला. त्यासंबंधित अजून एका कंपनीत नोकरीला लागला. CCTV सर्व्हिसच्या बाबतीत संपूर्ण अभ्यास करून माहिती मिळविली आणि लवकरच स्वतः क्लायंट जोडायला सुरुवात केली. कंपनीत नोकरी, कॉलेज आणि स्वतःची टेक्निकल सिक्युरिटी सर्व्हिसेस अशी स्वप्नीलची दिवसभराची रुटीन सुरू झाली होती. २०२० मध्ये पदवी पूर्ण झाली आणि व्यवसायावर लक्ष द्यायला आणखी वेळ मिळाला. दरम्यानच्या काळात त्याचा भाऊ मोरेश्वरला आपल्या व्यवसायात ओढलं.
सध्या दोघे भाऊ ‘टेक्निकल सिक्युरिटी सर्व्हिसेस’ चालवतात. सोबतच खासगी नोकरीदेखील करतात. त्यांनी पुण्यातल्या खराडी भागात आपलं ऑफिसही सुरू केलं आहे. दोघे नोकरीतून मिळालेला पैसा व्यवसायात गुंतवतात. त्यामुळे दिवसेंदिवस त्याचा CCTV सर्व्हिसचा व्यवसाय वाढत आहे. गेल्या दीड वर्षात हजारो क्लायंटची कामे त्यांनी फत्ते केली आहेत. जस्ट डायलवर खूप चांगल्या आणि सकारात्मक प्रतिक्रिया ग्राहकांकडून त्यांना दिल्या जातात.


आपल्याला जेव्हा एखादी वेगळी आयडिया सुचते तेव्हा त्वरित ती अमलात आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तेव्हा आपण जे करतोय ते इतर लोक करतात की नाही याचा विचार नाही करायचा आणि कोणत्याही कामात किंवा व्यवसायात संयम खूप महत्त्वाचा असतो, असं स्वप्नील म्हणतो.
जवळ काहीही नसताना या दोन मारकड बंधूंनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचा हा व्यावसायिक प्रवास तरुणांसाठी प्रेरक ठरणारा आहे.

Nilam: