नवी दिल्ली : (Padma Shri Awards in Farmers) कृषी क्षेत्रात (Agricultural Sector) बदल घडवणाऱ्या देशातील चार शेतकऱ्यांना (Farmers) यावर्षी पद्मश्री पुरस्कार (Padma Shri Awards) जाहीर झाला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मश्री पुरस्कारांचा घोषणा करण्यात आली. यामध्ये देशातील चार शेतकऱ्यांना देखील हा मानाचा सन्मान जाहीर झाला आहे. या शेतकऱ्यांनी शेती क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं आहे. तसेच इतर शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं सिक्कीम, ओडिशा, केरळ आणि हिमाचल प्रदेशमधील प्रत्येकी एका शेतकऱ्याला पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्यांमध्ये सिक्कीमचे 98 वर्षीय शेतकरी तुला राम उप्रेती यांचाही समावेश आहे. त्याचबरोबर ओडिशाचे पतायत साहू, केरळचे चेरुवायल रमन आणि हिमाचल प्रदेशचे नेकराम शर्मा यांचा समावेश आहे.
सिक्कीमचे तुला राम उप्रेती : आज सिक्कीम (Sikkim) हे संपूर्ण जगात एक सेंद्रिय शेती करणारं राज्य म्हणून उदयास येत आहे. सिक्कीमच्या सेंद्रिय उत्पादनांना देश-विदेशात विशेषात मोठी मागणी आहे. येथील उत्पादनांनी मोठी ओळख निर्माण केली आहे. सिक्कीमचे 98 वर्षीय शेतकरी तुला राम उप्रेती हे देखील अशा शेतकर्यांपैकी आहेत, यांनी आयुष्यभर पारंपारिक पद्धतीने सेंद्रिय शेती करुन नाव कमावले आहे. आजच्या युगात जिथे शेतकरी सेंद्रिय शेती करण्यास टाळाटाळ केली जाते, तिथे तुला राम उप्रेती यांच्यासारखे शेतकरी प्रेरणास्त्रोत आहेत.
काही शेतकरी अनेक दशकांपासून औषधी वनस्पतींचे उत्पादन घेत आहेत. शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत. या शेतकऱ्यांमध्ये ओडिशाच्या (Odisha) पटायत साहू यांचाही समावेश आहे. साहू यांनी केवळ दीड एकर जमिनीत 3 हजाराहून अधिक आयुर्वेदीक औषधांची निर्मिती केली आहे. तसेच त्यांनी त्यांचे अनुभव सांगणारे लेखही प्रकाशित केले आहेत. विशेष म्हणजे साहू यांनी कोणत्याही रसायनाशिवाय औषधांची निर्मिती केली आहे. त्यांचे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.
आज भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा तांदूळ उत्पादक देश म्हणून ओळखला जातो. तांदळाचे प्रगत संकरित वाण आज देशात प्रचलित झाले असले तरी औषधी, हवामान बदलांना प्रतिरोधक आणि विशेष देशी भाताचे वाण अनेक शतकांपासून अस्तित्वात आहेत. यातील अनेक नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. केरळच्या (kerala) चेरुवयल रामण हे गेल्या अनेक वर्षांपासून तांदळाच्या देशी प्रजातींचे संवर्धन करत आहेत. त्यांनी तांदळाच्या 54 देशी वाणांचे संवर्धन केलं केलं आहे. चेरुवयल रामण यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशी बियाणांच्या संवर्धनासाठी समर्पित केलं आहे.
हिमाचल प्रदेशचे ( Himachal Pradesh) नेकराम शर्मा यांना देशी धान्यांचे रक्षणकर्ता असं म्हटलं जातं. कारण शर्मा यांनी गेल्या 30 वर्षांपासून 40 अनोख्या धान्यांच्या वाणांचं संवर्धन केलं. नेकराम शर्मा यांनी ‘नऊ धान्य’ पारंपरिक पीक पद्धतीचे पुनरुज्जीवन केलं आहे. आजच्या आधुनिक युगात जिथे शेतकरी नवीन तंत्रे आणि संकरित बियाणांच्या माध्यमातून उत्पादन वाढवण्यावर भर देतात. तिथे निसर्गाचं संवर्धन करुन पारंपरिक पद्धतीनं नेकराम शर्मा यांनी देशी बियाणांचं संवर्धन केलं आहे.