बर्याचदा माणूस हा केवळ कपडे घालणारा पशू आहे, तो त्यापुढे उत्क्रांत झाला नाही, याचा प्रत्यय येतो. नुकताच आम्ही असा अत्यंत दुःखद अनुभव घेतला.
आपण सांगली जिल्ह्यातील विट्याजवळील गार्डी गावाच्या वीज व पाणी नसलेल्या माळरानावर गेली १८ वर्षे टँकरने पाणी आणून जी देवराई/ वनीकरण (स्वामी विवेकानंद ऑक्सिजन पार्क) तयार केली, तिथे आता १५०० झाडांचे वन तयार झाले आहे.
गेल्या २/३ दिवसांत मी व्याख्यानासाठी बाहेरगावी गेलो होतो, त्या दरम्यान तिथे बैलगाडी शर्यतीच्या निमित्ताने काही गुंडांनी अक्षरशः धुडगूस घातला. मी गेल्या पावसाळ्यात लावलेली कित्येक रोपे उपटून टाकली. ड्रीपच्या पाईप अस्ताव्यस्त करून टाकल्या.काही झाडांच्या फांद्या मोडल्या. प्लास्टीकच्या मिनरल वॉटरच्या बाटल्यांचा सर्वत्र खच पडला आहे. थोडक्यात कमी श्रमात जेवढा जास्त विध्वंस करता येईल तेवढा केला आहे. निमित्त बैलगाड्यांच्या शर्यतीचे ! आपल्या ग्रामीण भागात सध्या शिगेला गेलेला हा असंस्कृत हुमदांडगेपणा समाजाचे दीर्घकालीन नुकसान करतो आहे, याची यत्किंचितही जाणीव/चाड राजकीय नेत्यांना नाही. उलट ते अशा उपद्रवी लोकांना पदरी बाळगतात. त्यांच्या प्रत्येक अपराधावर पांघरूण घालतात.
कोणी थेट पोलिसांकडे तक्रार नोंदवली, तर अशा गुंडपुंडांना सोडवण्यासाठी धावून जातात. न्याय म्हणजे काय, असा निरागस प्रश्न विचारावा इतक्या आपल्या व्यवस्था रसातळाला गेल्या आहेत. ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणावर ज्या पडीक जमिनी दिसतात, त्याचेही कारण हा गुंडांचा उपद्रव हेच आहे. त्या जमिनींचे मालक रोजगारासाठी शहरात गेले. त्यांच्या जमिनी पडीक राहिल्या. त्यावर काही लागवड करावी, पैसा गुंतवावा असे जरी त्यांना वाटले, तरी त्यांना यासाठी विश्वासू, कष्टाळू मनुष्य कामाला मिळणे जवळपास अशक्य झाले आहे. शिवाय गावटग्यांचा उपद्रव असतोच.
याशिवाय जनावरे चारायला नेणारे लोक स्वत:च्या हातात एक कुर्हाड घेऊन फिरतात. त्यांनी जन्मात कधीच ज्या झाडांना थेंबभर पाणी घातले नाही, अशा झाडांच्या फांद्या छाटून जनावरांना पाने खायला घालतात. या कोडगेपणाची त्यांना कसलीही टोचणी लागत नाही. गार्डीच्या वनीकरणाने सहन केलेला हा असा तिसरा आघात आहे. यापूर्वी एकदा एकाने वाळलेले गवत पेटवून दिले, तो वणवा पसरत आपल्या क्षेत्रातील सहाशे झाडे जळून त्यांचा कोळसा झाला होता. आम्ही पुन्हा ड्रीप जोडून शांतपणे पाणी घालायला सुरुवात केली. ती सगळी झाडे पुन्हा मुळ्यांमधून फुटून हिरवीगार झाली. यात किमान पाच/सहा वर्षे गेली.
एकदा शेळ्या मेंढ्यांचे कळप घेऊन फिरणार्या गुराख्यांनी ते कळप आपल्या झाडीत घुसवून त्यांना चारण्यासाठी किमान शंभर सव्वाशे झाडांच्या फांद्या छाटून टाकल्या. हा विध्वंस करून ते गायब झाले. पोलिसात लेखी तक्रार नोंदवली, परिणाम शून्य!
आपल्या व्यवस्था बुजगावण्यासारख्या निष्क्रिय झाल्या आहेत. त्या कुठे आणि केव्हा गतिमानता दाखवतात, हे आपण रोज बातम्यात अवाक होऊन पाहतो आहोत.
सारांश काय? आपल्या समाजाचा तोल पुरता ढासळला आहे. आम्ही देश स्वतंत्र झाल्यानंतर गेल्या ७५ वर्षांत शिक्षण सार्वत्रिक केले, पण त्यामुळे समाज फक्त साक्षर झाला. मनुष्य सुसंस्कृत आणि संवेदनशील करण्याच्या दिशेने आम्ही एकही पाऊल उचलले नाही. आपल्या शहरांमध्ये लोकांवर २४ तास लक्ष ठेवण्यासाठी आपण जे हजारो सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत, त्यावर कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली त्याचे कारण समाजाची घसरत गेलेली विश्वसनीयताच नाही का? हे अरण्यरुदन करता यावे, यासाठीच आपण देववृक्षांची लागवड केली असे वाटते. माझ्या परिचयातील राजकारणी मित्रांना एक कळकळीची विनंती करावीशी वाटते, की कृपया तुमच्या पावलांचा स्पर्श स्वामी विवेकानंद ऑक्सिजन पार्कच्या पवित्र भूमीला होऊ देऊ नका. एवढीच काळजी घ्या.
आमचे आणि प्रकृती, निसर्ग, झाडे, पशू, पक्षी यांचे जे काही बरेवाईट होईल ते आमचे आम्ही पाहू. मी गेल्या १८ वर्षांत निसर्गाकडून एवढेच शिकलो, की निसर्गातला एकही जीव प्रकृतीच्या नियमांचे उल्लंघन करीत नाही. ते सारे सातवा वेतन आयोग न मागता सतत प्रकृतीचे काम करतात. अपवाद फक्त मनुष्याचा आहे. त्याच्या बाबतीत प्रकृतीचा अंदाज पार सपशेल चुकला आहे असे दिसते. भरीत भर म्हणून सरकार अशा लोकांना फुकट धान्य, न परतीचे कर्ज, निवडणुकांच्या हंगामात फुकटच्या जेवणावळी, व्यसने, अशी निरंतर खैरात वाटण्याने समाजाचे पुरते वाटोळे होईल, यात आश्चर्य काय? एखाद्याचा सर्वनाश करायचा हा अगदी सोपा मार्ग आहे. त्याला सारेकाही बसल्या जागी विनामूल्य द्या. तो काम करणं पुरतं विसरून जाईल. त्याच्या निष्क्रियतेने त्याचा प्राण गेला तरी तो फारशी हालचाल करणार नाही.
आमची १३० कोटी लोकसंख्या आमचे मनुष्यबळ ठरण्याऐवजी त्यांच्या वाढत्या निष्क्रियतेने आणि उपद्रवी वर्तनाने अभिशाप ठरते आहे. हे दुरुस्त करणे आता मानवी आवाक्यात राहिले नाही. त्यासाठी नियतीलाच मोठ्या प्रमाणात सफाई करावी लागेल असे वाटते. मनुष्य विध्वंसक आहे. त्याचे पाऊल जिथे पडले नाही, तिथेच प्रकृती समृद्ध आहे. मनुष्याला या विध्वंसक नतद्रष्ट मानसिकतेसाठी नियतीने कोरोना काळात सक्तीने घरी बसवूनही त्याच्या डोक्यात काही प्रकाश पडला नाही. आता प्रकृती बहुधा निर्दयतेने भूमीवरील भार हलका करेल.
गार्डीला रोपे लावताना ज्या छोट्या पिशव्यांमध्ये ती रोपे तयार केली होती, त्यात काही पिशव्यांत एक रोप, काहीत दोन रोपे, काहीत तीन रोपे उगवलेली होती. त्या रोपांच्या मुळ्या एकमेकांत गुंतलेल्या असल्याने आम्ही ती रोपे तशीच एकत्र लावली. पाणी घालण्यासाठी प्रत्येक रोपाला दर चार दिवसांनी जमिनीत बसवलेल्या मिनरल वॉटरच्या दोन बाटल्यांमध्ये एकेक लीटर पाणी आम्ही ओतायचो. मी साधं गणित केलं, एका रोपाला दोन लीटर पाणी,तर तीन एकत्र रोपांना सहा लीटर पाणी घालायला हवे. पण आम्ही सर्वच रोपांना दोन दोन लीटरच पाणी देत होतो. रोज निरीक्षण करताना असे दिसले की, ज्या एका रोपाला दोन लीटर पाणी मिळत होते, त्याच्यापेक्षा ज्या तीन रोपांना एकत्रित दोनच लीटर पाणी मिळत होते, त्यातल्या प्रत्येक रोपाची वाढ जास्त जोमाने झाली होती. याचा अर्थ काय? त्या वेगवेगळ्या प्रकारच्या रोपांनी ते मर्यादित दोन लीटर पाणी समंजसपणाने एकमेकांत वाटून घेतले आणि एकमेकांची वाढ व्हावी यासाठी ते परस्परांना प्रोत्साहित करीत होते. मनुष्य असा समजदारपणा दाखवेल तर आपला समाज किती आनंदी होईल? मनुष्याने निसर्गापासून शिकण्यासारखे खूप काही आहे.
आम्ही देत असलेल्या अत्यंत मर्यादित पाण्यात ती रोपे आनंदात होती. आता ती रोपे वर्षभरात माझ्या उंचीची झाली. पक्षी येऊन त्या झाडांवर बसायला लागले. ते काड्या गोळा करून झाडाच्या फांद्यांवर बेचक्यात घरटं तयार करू लागले. मी रोज त्यांची खटपट पाहात होतो. आता मला त्यांची आणि त्यांना माझी सवय व्हायला लागली होती. चिंचेच्या एका झाडावर चिमणीने त्या काड्यांच्या बिछान्यावर तीन अंडी घातली. ते चिमणा-चिमणी त्या अंड्यांभोवती दिवसभर भिरभिरत असत.
आपली पिल्लं कधी जन्माला येतात, याची उत्सुकता मी त्यांच्या लगबगीत अनुभवत होतो. मीही रोजचा झाडांना पाणी घालण्याचं काम झालं, की त्या चिंचेच्या झाडासमोर उभा राहून त्या अंड्यांकडे पहात उभा रहायचो. असे प्रतीक्षेचे काही दिवस गेल्यावर एका दिवशी मला त्या अंड्यात आतून हालचाल दिसली. मी शांतपणे ते दृश्य पाहू लागलो. साधारण दीड तास तरी आतून ते पिल्लू अंड्याचे कवच फोडण्याचा प्रयत्न करत होते. त्या कवचाला हळूहळू लहान तडे पडायला लागले. त्या पिल्लाच्या धडपडीने, त्याने इवल्याशा चोचीने केलेल्या आघाताने ते तडे मोठे होत होत त्या कवचाचा काही भाग गळून पडला.
ते छोटेसे पिल्लू त्या अंड्यात होते. त्याच्या डोक्यावरून, डोळ्यांवरून एक स्राव हळूहळू ओघळत त्याचे थेंब थेंब खाली पडत होते. मग त्या पिल्लाने त्याचे डोळे उघडण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याच्या डोळ्यावर एक अत्यंत नाजूक पटल होते. काही वेळ धडपड केल्यानंतर त्याने एकदा डोळे उघडले. मी अगदी कुतूहलाने तो क्षणन् क्षण पहात, अनुभवत होतो. त्याने डोळे उघडण्याचा क्षण, माझी आणि त्या पिल्लाची नजरानजर झाली. ते नितळ, निरागस डोळे, ज्यांनी ते पिल्लू जन्माला आल्यानंतर पहिल्यांदाच हे जग पहात होते, त्या इवल्याशा तेजस्वी डोळ्यात मला जो विश्वास दिसला, त्याने आनंदाची एक लहर माझ्या सर्वांगातून गेल्याचा अनुभव मी घेतला. इतकी तरलता आपण अगदी क्वचितच अनुभवतो.
मी याची देही याची डोळा जे अवर्णनीय सुख, आनंद अनुभवला, मला काही दिवस मी तिथे नसताना ते नाजूक पिल्लू आणि नंतर जन्माला आलेली त्याची भावंडं सुरक्षित राहतील का? याची सारखी काळजी वाटायची. पण त्यांचे आई बाबा त्यांना काय काय आणून खायला घालत असायचे. चिवचिवाट करून आपल्या आईबाबांना भूक लागलीये असं सांगणारी ती पिल्लं बसल्या जागी पंखांची फडफड करायचा सराव करू लागली. एके दिवशी ते घरटं पूर्ण रिकामं सोडून ती उडून गेली. आपण विद्यार्थ्यांना शाळेत इतक्या सहजतेने शिकवू शकू का?
अभय भंडारी
वनप्रेमी (भाग-१)