पुणे : जागतिक आरोग्य संघटना ही सर्व देशांना आरोग्याविषयी मार्गदर्शन करणे, आरोग्यविषयक धोरण ठरविणे यासाठी काम करणारी संघटना असून, या संघटनेचे मत अंतिम आणि ग्राह्य मानले जाते.
कोरोना काळात जागतिक आरोग्य संघटनेने केलेले मार्गदर्शन आणि लसीकरणासंदर्भातील सूचना तसेच लसींना मिळालेली मान्यता यामुळे कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी या संघटनेने खूप चांगले मार्गदर्शन केले होते. ७ एप्रिल १९४८ रोजी संयुक्त राष्ट्राने जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना केली असून, टेड्रोस अधानोम हे या संघटनेचे सध्याचे संचालक आहेत. त्यांनी १ जुलै २०१७ रोजी हा पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी ते माजी आरोग्य मंत्री व इथिओपिया या देशाचे परदेशमंत्री होते. संघटनेचे मुख्य कार्यालय जीनिव्हा, स्वित्झर्लंड येथे आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सार्वजनिक आरोग्यासाठी केलेल्या अनेक कामांमध्ये प्रमुख भूमिका बजावली आहे. विशेषत: रोगनिर्मूलन, पोलिओचे निर्मूलन आणि इबोला लसीचा विकास. त्याच्या सद्य प्राधान्यांमध्ये संसर्गजन्य रोगांचा समावेश आहे.
२०२२ ची जागतिक आरोग्य संघटनेची थीम ही ‘युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज’ यावर आधारित आहे. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी दैनंदिन आहारात फळे, भाज्या, संपूर्ण धान्य या पौष्टिक गोष्टींचा समावेश करावा. निरोगी राहण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे. तसेच आरोग्यदायी आहार म्हणजेच फॅट आणि प्रोटिनयुक्त असावा. तणाव हे आजारांना निमंत्रण देत असते. तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दैनंदिन व्यायाम केला तर तुमचे आरोग्य उत्तम राहू शकते.
_डॉ. राजीव दंडगे, बीएचएमएस, मुंबई
१९४ देशांच्या प्रतिनिधींनी बनलेली वर्ल्ड हेल्थ असेंब्ली ही संस्था सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था म्हणून काम करीत असून, ३४ आरोग्यतज्ज्ञ कार्यकारी मंडळाची निवड करीत असतात. जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना १९४८ साली झाली असली तरी त्याच्या जवळपास शंभर वर्षे आधीपासूनच वेगवेगळ्या देशांनी आरोग्याच्या मुद्यांवर एकत्र येण्यास सुरुवात केली होती. १८५१ साली पॅरिसमध्ये पहिल्या इंटरनॅशनल सॅनिटरी कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते. १९३८ पर्यंत या कॉन्फरन्सची चौदा अधिवेशने झाली. गेल्या सात दशकांत सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रातील सुधारणांमध्ये जागतिक आरोग्य संघटनेचाही वाटा आहे.
कुठल्याही नव्या आजाराची माहिती मिळवणं आणि ती लोकांपर्यंत पोहोचवणे, आजारांच्या साथी पसरत असतील तर त्याविषयी देशांना सावध करणे, लस आणि उपचारांविषयी संशोधन, आरोग्यासाठी निधी जमा करून जिथे गरज असेल तिथे पोहोचवणे अशी कामे ही संघटना करते. गेल्या दोन वर्षांत जगाला हादरवून सोडणार्या कोरोना विषाणूला अद्यापही आपण सर्व सामोरे जात आहोत. २०१९ मध्ये कोरोना व्हायरसचा एक प्रकार चीनमधील वुहान शहरात आढळून आला. याला कोविड-१९ असे नाव देण्यात आले. सुरुवातीस वुहान व आसपासच्या प्रदेशात पसरलेला हा विषाणू त्याच्या इतर उपप्रकारांपेक्षा अधिक तीव्रतेचा असून, याने रोग्यांच्या मरण्याचे प्रमाण मोठे होते. १३ मार्च २०२० अखेर जगात १,३२,७५८ जणांना या आजाराची लागण झाली.
एकूण ४९५५ जणांचा मृत्यू झाला होता. एकूण १२२ देशांमध्ये हा आजार पसरला होता. चीनमधील हूबै प्रांतात या आजारामुळे सर्वाधिक बळी गेले आहेत. यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेने आपली महत्त्वाची भूमिका बजावत कोविशिल्ड व कोवॅक्सिन, स्फुटनिक, फायझर या कोरोनाप्रतिबंधक लशींना मान्यता देऊन कोरोना नियंत्रणात आणण्याचे काम या संघटनेने केले आहे.