जाळ्यांतील चंद्र

कोणतेही व्यक्तिमत्त्व किंवा काव्य स्वतःच्या शब्दात पकडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे समुद्रात जाळे पांगून त्यात आकाशातील चंद्राचे प्रतिबिंब पकडण्याचा प्रयास करणे. जाळे पांगलेले असेपर्यंत त्यात प्रतिबिंब पडल्याचा भास होतो. परंतु किनार्‍यावर आणून ते झटकले की, त्यातून ते निसटल्याचे आढळून येते. परीक्षण विषयक झालेल्या ग्रंथादिकांच्या बाबतीत हे जेवढे खरे आहे तेवढेच या समीक्षालेखांच्या बाबतीतही ते खरे असणार…!

म. वा. धोंड यांचे जाळ्यांतील चंद्र या समीक्षा लेखसंग्रहातलं हे अवतरण. धोंड यांच्या या समीक्षा ग्रंथात एकूण अकरा लेख आहेत. मराठी भाषेत ज्या पुस्तकांनी अढळस्थान निर्माण केले आहे अशा पुस्तकांचे समीक्षण धोंड यांनी केले आहे. यातील काही पुस्तके लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत, तर यातील काही पुस्तकांना हे भाग्य लाभलेले नाही. मात्र त्या पुस्तकांमधला आशय, लेखकाचे शब्दसामर्थ्य, विषयाचा वेध घेण्याची पद्धत अफाट आहे. मात्र मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे कागदावर उमटलेल्या प्रत्येक अक्षराला प्राक्तन असते आणि हे प्राक्तन पुस्तकाच्या यश, अपयशाच्या मर्यादा स्पष्ट करीत असले, तरी या अपयश आणि यशावरून पुस्तकाची गुणवत्ता ठरतेच असे नाही. जाळ्यातील चंद्र या पुस्तकात स्वामी, बालकवी, आनंदी गोपाळ, रघुनाथाची बखर, चातुर्धामी, र. धों. कर्वे, सखाराम बाइंडर, नाच ग घुमा, पोत, शिवसमर्थ आणि आनंदवनभुवनी अशा अकरा प्रकरणांचा समावेश आहे.

धोंड यांनी या प्रत्येक पुस्तकातील कमतरता, त्रुटी दाखवून दिल्या आहेत. वाचकांच्या मनात, ध्यानात या त्रुटी येत नाहीत, कारण भाषेचा प्रवाह आणि काही ठिकाणी भावोत्कटता यांचे मिश्रण इतके प्रभावी आहे की, अशाप्रकारच्या कमतरता लक्षात येणे शक्य नसते आणि त्यापुढे जाऊन लेखकाने निर्माण केलेल्या भावविश्वात वाचक पूर्णपणे रममाण झालेला असतो. साहजिकच समीक्षकाची भूमिका तो स्वीकारत नाही. त्यामुळे लेखकाने अनेक ठिकाणी लेखन स्वातंत्र्य घेतले असले तरी त्यामध्ये कमतरता कशा निर्माण होतात याची अनेक उदाहरणे धोंड यांनी सप्रमाण दिली आहेत.

उदाहरणार्थ रणजित देसाई यांच्या स्वामी या कादंबरीने रमा माधव या आदर्श जोडप्याबद्दल अक्षरशः भक्तिभाव वाचकांच्या मनात निर्माण केला. धोंड यांनी या कादंबरीतील त्रुटी दाखवून दिल्या आहेत. भाषिक सौंदर्य आणि आशय अनुरूप मांडणी यामध्ये असणारी तफावतही ते दाखवतात. द. ग. गोडसे यांच्या लेखनाचा चाहता वर्ग आहे. गोडसे यांचे लिखाण अभ्यासपूर्ण, त्याचबरोबर अत्यंत नेमक्या दाखल्याचे असते.

भाषेचे सौंदर्य असो अथवा रंग-रेषा त्यातली गती. त्यामध्ये असणार्‍या घाटांची रचना याबाबत गोडसे अत्यंत मार्मिकपणे आणि नेमकेपणाने लिहितात. असे असले तरीही गोडसे यांच्या लेखनात सुटलेल्या जागा आणि त्यांच्याकडून राहिलेले शब्दसौंदर्य यांना सांधणारे पूल धोंड सव्यासाची पद्धतीने दाखवतात. शिवसमर्थ यामध्ये गुरू कोण, शिष्य कोण याबाबत ऐतिहासिक वाद आणि त्याचे दाखले यावरून यासंदर्भात काही स्पष्टीकरण देऊ इच्छितात. हे प्रकरण मुळातून वाचणे आवश्यक आहे.

सखाराम बाइंडर या लिखित स्वरूपातील नाटकाची आणि रंगमंचावरील नाटकाची तुलना करीत असताना माध्यमांतरातले भेदही ते कळत नकळत दाखवून देतात. पात्रांच्या मानसिकतेच्या संदर्भातील विश्लेषण, टिकाटिप्पणी करीत एक वेगळी दृष्टी आपल्या वाचकांना ते देतात. खरेतर समीक्षेच्या विविध प्रकारांपैकी ही समीक्षा रा. ग. जाधव, म. द. हातकणंगलेकर किंवा माधव आचवल यांच्यासारखी आस्वादात्मक नाही. ती स्पष्टपणे साहित्यकृतीमधील कमतरता दाखवते आणि स्वतःचे मत अधोरेखित करते. समीक्षा याचाच अर्थ सम इक्ष, समान दृष्टीने पाहणे असा आहे.

साहजिकच धोंड यांनी या अकरा साहित्यकृतींची, तराजूच्या दोन्ही भागांवर समान मोजमाप व्हावे असेच लेखन केले आहे. धोंड यांचे लेखन अत्यंत स्पष्ट, नेमके, साहजिकच अभ्यासू आग्रही आणि काहीवेळा लेखकांच्या मर्यादाही स्पष्ट करणारे दिसून येते. समीक्षेचा अभ्यास करणार्‍यांसाठी हे पुस्तक आदर्शवत आहे आणि केवळ एकदाच नव्हे तर मूळ पुस्तक वाचून ही समीक्षा पुन्हापुन्हा वाचण्यासारखे नक्कीच आहे. धोंड यांनी हे पुस्तक अर्पण करताना ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीमधील ९ व्या अध्यायातली १३६ वी ओवी स्पष्टीकरणाकरिता दिली आहे. धोंड यांनी काही विचार मात्र त्यांच्या लेखणीने तयार केलेल्या जाळ्यात पकडले आहेत आणि आपल्या मनात सोडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
धन्यवाद…!

_मधुसूदन पतकी

admin: