तुका आकाशाएवढा…!

जागतिक धर्मसंसद म्हटले की, कुणाही भारतीयाची मान अत्यंत गौरवाने व अभिमानाने उंचावते व भारताचे थोर सुपुत्र श्री स्वामी विवेकानंद यांनी ११ सप्टेंबर १८९३ साली शिकागो येथे धर्मसंसदेत केलेल्या भाषणाचे स्मरण होते. तेव्हा ‘अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो,’ असा उच्चार करताच शिकागो येथील त्या सभागृहात २ ते ३ मिनिटे उभे राहून सर्व प्रतिनिधींनी टाळ्यांचा कडकडाट केला.

समग्र मानवजातीस बंधुत्वाचा संदेश देणार्‍या विवेकानंदांच्या या भाषणामुळे भारतीय संस्कृतीचे अमेरिकेत प्रचंड स्वागत झाले आणि भारतीय संस्कृतीचा अमेरिकेत गजर झाला. सॉल्ट लेक सिटी (युटा स्टेट), अमेरिका येथे ‘जागतिक धर्मसंसद’ भरली होती. माईर्स एमआयटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), पुणेच्या वतीने प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या नेतृत्वाखाली या धर्मसंसदेत सहभागी होण्याची संधी मला मिळाली होती. धर्मसंसदेमध्ये प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी प्लेनरी सेशनमध्ये (परिपूर्ण सत्र) आपले विचार मांडले.

प्रचलित शिक्षणपद्धतीमध्ये आपण धर्माचा/अध्यात्माचा समावेश केला नाही, याबद्दल खेद व्यक्त करून डॉ. कराड म्हणाले की, आता तरी महाविद्यालयांनी/ विद्यापीठांनी आपल्या शिक्षण पद्धतीत अध्यात्माचा समावेश करावा व बंधुभाव, दया, करुणा, प्रेम, मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथीदेवो भव, आचार्यदेवो भव, राष्ट्रदेवो भव ही व अशी अनेक जीवनमूल्ये विद्यार्थ्यांनी अंगीकारल्यास, निश्चितच जगात सुख, समृद्धी व शांती लाभेल. तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचे ‘पसायदान’ व तत्त्वज्ञ संत श्री तुकाराम महाराज यांचे ‘अणुणुया थोकडा, तुका आकाशाएवढा’ हे सांगायला मात्र डॉ. कराड विसरले नाहीत.

प्रा. डॉ. कराड यांनी अथर्ववेदातील उतार्‍याचा हवाला देऊन वेदान्तामध्ये ‘वसुधैव कुटुंबकम’ ही भारतीय संस्कृती कशी सांगितली आहे याचे फार प्रभावी वर्णन आपल्या भाषणात केले. ते म्हणाले,
“आपण मानवजात एकाच घरट्यातील पक्षी आहोत,
आपल्या त्वचेचा रंग वेगळा असेल,
आपण वेगवेगळ्या भाषा बोलत असू,
आपण वेगवेगळ्या धर्माचे अथवा पंथाचे असू,
आपली संस्कृती भिन्न असेल
तरी आपण सर्वजण एकाच पृथ्वीवर राहतो,
आपण एकच आकाश पांघरतो व आपण एकाच प्रकारचा ‘श्वास’ घेतो.

याचा अर्थच असा, आपण सर्वजण एक आहोत व आपण एकत्र राहूनच आपली प्रगती करू या. जर आपण वेगवेगळे राहिलो तर आपण नष्ट होऊ.’ प्रा. डॉ. कराड यांच्या अथर्ववेदाच्या या उेखाने लोक भारावून गेले. त्यांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात डॉ. कराड यांना अभिवादन केले आणि भारतीय संस्कृतीच्या सहिष्णुतेचा, प्रेमाचा, शेजारधर्माचा, स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा पुन्हा एकदा संदेश जागतिक धर्मसंसदेत दिला आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाटात डॉ. कराड यांचे भाषण संपले आणि भारत देशाच्या या महान तत्त्वज्ञ सुपुत्राने सातासमुद्रापलीकडे विज्ञानाच्या माध्यमातून सांगितलेले अध्यात्म संपूर्ण धर्मपरिषदेत चर्चेचा विषय ठरला.

Prakash Harale: