मुंबई : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. तसंच, काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या झालेल्या सभेवरून व त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलेल्या टीकेला देखील उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. “जे आता बेंबीच्या देठापासून ओरडताय की शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, हिंदुत्व सोडलं, कसं काय सोडलं? तुम्हाला सोडलं म्हणजे काय हिंदुत्व नाही सोडलं. तुम्ही म्हणजे काय हिंदुत्व नाही, तुम्ही काय हिंदुत्वाचं पेटंट घेतलेलं नाही.” असं यावेळी म्हणत हिंदुत्वाच्या मुद्य्यावरून मुख्यमंत्र्यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.
पुढे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “सर्वप्रथम सर्वांना रामनवमीच्या मी शुभेच्छा देतो. अशी सभा घेण्याची माझी सवय नाही, कारण आपण समोरा-समोर लढणारे मर्द आहोत. कोल्हापूर ही तर मर्दांची भूमी आहे. कालच आपला कुस्तीपटू पृथ्वीराज याने महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवलेला आहे. मला स्वत:ला अभिमान आहे, की पृथ्वीराजच्या रूपाने २१ वर्षानंतर कोल्हापूरला हा बहुमान मिळाला. पृथ्वीराजचं मी मनापासून अभिनंदन करतोच आहे, पण लढायचं कसं आणि ते सुद्धा मर्दाने लढायचं कसं हे या कोल्हापूरच्या मातीतून शिकलं पाहिजे. तरी नशीब ही निवडणूक आहे, राजकीय पक्षांच्या जर का कुस्त्या सुरू झाल्या तर आपल्या समोरासमोर लढणारा मर्द कुणी नाहीए, पण कुस्तीमध्ये जर भाजपा उतरला तर समोरच्या पैलवानाशी कुस्ती खेळण्यापेक्षा आदल्या दिवशी त्याच्यावरती धाडी टाकेल. सीबीआय, ईडी इत्यादींची धाड आणि मग स्वत:मध्ये धमक काही नसताना, मी जे बोललो होतो की मर्दाने मर्दासारखं लढलं पाहिजे आणि मर्दाने कसं लढायचं हे कोल्हापूरच्या मातीतून शिकलं पाहिजे.”