पुणे : अन्न, वस्त्र आणि निवारा या तृतीयपंथीयांच्या मूलभूत समस्या आहेत. यातील महत्त्वाचा दुवा त्यांचा मताधिकार आहे. एका मताचे सामर्थ्य सर्वांनी जाणून घ्यायला हवे. मताधिकार असला तर संघटितपणे आपल्या समस्या दूर करता येणे शक्य आहे. त्यामुळे तृतीयपंथीयांसाठी काम करणार्या संस्थांनी मतदार म्हणून त्यांची नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रधान सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.
आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिनानिमित्त आयोजित ‘सतरंगी-इंद्रधनुष्य समारंभा’त ते बोलत होते. कार्यक्रमाला मुक्तपत्रकार संयोगिता ढमढेरे, किशोरी गद्रे, छायापत्रकार जोया लोबो, ललित साळवे आदी उपस्थित होते. श्री. देशपांडे म्हणाले, लोकशाही खर्या अर्थाने प्रगल्भ होण्यासाठी ती सर्वसमावेशक असायला हवी आणि त्यात सर्वांचा सहभाग असायला हवा, अशी भावना ठेवून निवडणूक आयोग काम करते आहे. देहविक्री करणार्या स्त्रिया किंवा तृतीयपंथीय व्यक्तींना या प्रवाहात सहभागी करून घ्यायला हवे. निवडणूक आयोगाने मतदारयादीत तृतीयपंथी व्यक्तींचे नावनोंदणीसाठी काही विशेष सुविधा दिली आहे. त्यांना वयाच्या दाखल्यासाठी गुरुचे ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. २१ वर्षांवरील तृतीयपंथीयांचे स्वत:चे प्रतिज्ञापत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते.
महंत श्री शिवलक्ष्मी यांची खंत
खरं तर मी वयाची अठरा वर्षे पूर्ण केली, तेव्हाच माझ्यातील नैसर्गिक बदल मला कळत होते, म्हणूनच मी स्त्री म्हणून किंवा पुरुष म्हणून समाजापुढे यावे, हा मोठा प्रश्न या समाजाने माझ्यासमोर मांडून ठेवला होता. म्हणूनच की काय, वयाची अठरा वर्षे पूर्ण करूनदेखील मी ठराविक स्त्री-पुरुष म्हणून मतदान आजपर्यंत करू शकले नाही आणि जेव्हा मी स्वतःला ट्रान्सवुमन म्हणून समाजासमोर आणले तेव्हा मला मतदानासाठी मिळणार्या अधिकारासाठी झगडत राहावे लागले आणि आजतागायत मी झगडत आहे.
निवासाच्या पुराव्यासाठी तृतीयपंथीयांसाठी काम करणार्या संस्थांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांचे प्रमाणपत्र रहिवास म्हणून पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतो. तृतीयपंथीय मतदारांबाबत हाच पुरावा ग्राह्य धरण्याचाही प्रस्ताव आयोगाला सादर करण्यात आला आहे. पोस्टाचे कुठलेही टपाल पत्त्यावर मिळाले असल्यास तोदेखील पुरावा ग्राह्य धरण्यात येतो. ही माहिती आपल्या सहकार्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
साहजिकच आहे, की ज्याप्रमाणे स्त्रीच्या ओळखपत्रावर स्त्री आणि पुरुषाच्या ओळखपत्रावर पुरुष लिहिले जाते, त्याप्रमाणे आम्हालादेखील आमची ओळख आमच्या लिंंगाप्रमाणे देण्यात यावी, म्हणूनच आमच्या मतदान ओळखपत्रावर ‘तृतीयपंथी’ असा स्पष्ट उल्लेख असल्यास ते अभिमानास्पद ठरेल.
_महंत श्री शिवलक्ष्मी, (आईसाहेब – किन्नर आखाडा)
राज्यात या दिवसाच्यानिमित्ताने मतदारनोंदणीचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. मतदारयादीतील नाव व तपशीलही बदलण्याची सुविधा आयोगाने दिली असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याने आनंद झाल्याचे नमूद करताना अशा कार्यक्रमातून नवी ऊर्जा मिळते, अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. पुरस्कारविजेत्या व्यक्तींचे निवडणूक आयोगाला ‘थिंकटँक’ म्हणून उपयोग होईल, असेही श्री. देशपांडे म्हणाले.
श्रीमती ढमढेरे यांनीदेखील यावेळी विचार व्यक्त केले. तृतीयपंथीयांना आपली ओळख प्रस्थापित करण्याची आता संधी मिळते आहे. काहींनी ही ओळख स्थापित करण्यासाठी प्रयत्न केल्याने हे शक्य झाले, असे त्यांनी सांगितले. उतरंडीचे जग नष्ट होऊन समतेचे जग स्थापित व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
श्री. देशपांडे यांच्या हस्ते संयोगिता ढमढेरे, शर्मिष्ठा भोसले, नंदिता अंबिके, मनीषा गोगटे, हरीष सदानी, गौरी शिंदे, बिंदूमाधव खिरे आणि ट्रान्स-थॉट संस्थेचा ‘सर्चलाईट’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. लावणी मार्गदर्शिका रोझा यांनादेखील यावेळी गौरविण्यात आले.
जोया लोबो यांनी आपल्या पत्रकारितेतील अनुभव यावेळी मांडले. स्वत:ला सक्षम करणे गरजेचे असल्याचे अनुभवातून शिकले. पहिली तृतीयपंथीय छायापत्रकार असल्याचा आंनद झाल्याचे त्यांनी सांगितले. निष्ठा डिशांत आणि विकी शिंदे यांनीदेखील अनुभव व्यक्त केला. शमिभा पाटील यांनी प्रास्ताविकात तृतीयपंथी ओळखदिनाच्या आयोजनाबाबतची माहिती सांगितली. ‘युनिसेफ’ने लिंगसमानता कार्यक्रमाचा भाग म्हणून हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विविध लावणी, शाहिरी जलसा, नाट्यप्रवेश आदी विविध कार्यक्रम सादर करण्यात आले.