मुंबई : शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. संजय राऊत यांचे अलिबाग मधील ८ फ्लॅट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर ईडीकडून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. यामुळे आता विरोधी पक्ष भाजपाकडून संजय राऊतांवर निशाणा साधण्यात येत आहे. तसंच संजय राऊतांनी त्यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की आपण एक पैशाचाही घोटाळा केलेला नाही. यासंदर्भात आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
एक पैशाचा घोटाळा नसल्याचा पत्रकारांना सांगून काही फायदा नाही. तसेच जर काही घोटाळा नसेल, तर त्यांनी न्यायालयात जावे आणि सिद्ध करावे. राऊतांच्या एक पैशाचा पण घोटाळा नाही अशा विधानावर जनतापण विश्वास ठेवणार नाही. असं चंद्रकांत पाटील म्हणाले. सत्तेत आल्यापासून आणि राऊत वापरत असलेल्या शब्दांचे पुस्तक काढण्याचे काम आपण एकाला दिले आहे. तसेच राऊत वापरत असलेले शब्द महाराष्ट्रातल्या संस्कृतीत बसतात का? असा प्रश्न सामान्य जनतेला विचारणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.
पुढे पाटील म्हणाले, राऊत अशाप्रकारे बोलणे हे नवीन नसल्याचे सांगत राऊत अनेकदा आपल्यावर बोलले आहेत. त्यामुळे त्यांना जे संस्कार आहेत त्याप्रमाणे ते बोलतात. राऊत यांच्यावरील कारवाई जर चुकीची असेल तर, न्याय व्यवस्था काही विकली गेलेली नाही. त्यामुळे या कारवाईविरोधात ते न्यायालयात दाद मागू शकतात. असंदेखील चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांनी प्रतिक्रिया देताना पुढचा नंबर भाजपचा असेल असा इशारा दिला होता. यावर बोलताना चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे की, आम्ही चळवळीतली माणसं असून, आम्ही जर काही चूक केली असेल तर आम्हाला शासन झालंच पाहीजे. त्यामुळे जर आम्ही काही चूक केली असेल तर त्याचे परिणाम आम्हाला भोगावे लागतीलच. त्यामुळे धमक्या देण्याचं काम नाही. आम्हीदेखील माणसंच आहोत. काही चूक झाली असेल तर आमच्यावरही कारवाई करा, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे