नवा आदेश जारी; ३० जूनपर्यंत मुदत
मुंबई : मद्यविक्री दुकाने व बार यांना देवदेवतांची, राष्ट्रपुरुषांची, महनीय व्यक्तींची, तसेच गडकिल्ल्यांची नावे देण्यास राज्य सरकारने बंदी घातली आहे. अशी नावे ३० जूनपर्यंत बदलण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत काही सामाजिक संघटना व लोकप्रतिनिधींनी तक्रारी केल्या होत्या. विधिमंडळातही हा मुद्दा उपस्थित केला होता. गृह विभागाने आदेशात म्हटले आहे की, राज्याच्या सुवर्ण इतिहासाचे साक्षीदार असलेल्या गडकिल्ल्यांविषयी, राष्ट्रपुरुषांविषयी प्रत्येकाच्या मनात आस्था आहे. त्यामुळे देवदेवता, राष्ट्रपुरुष आणि गडकिल्ले यांच्या नावाचा वापर केल्यास देवदेवता, राष्ट्रपुरुष व गडकिल्ल्यांची विटंबना तर होतेच. तसेच धार्मिक व सामाजिक भावना दुखावतात. सामाजिक वातावरणही दूषित होते.
राज्यातील गडकिल्ले आणि राष्ट्रपुरुषांचा, तसेच सर्वांच्या धार्मिक श्रद्धांचा आदर करणे व सामाजिक सलोखा कायम राखणे आद्य कर्तव्य आहे. गृह विभागाने एक यादी जाहीर केली आहे. त्यात ५६ राष्ट्रपुरुष व महनीय व्यक्तींचा आणि राज्यातील १०५ गडकिल्ल्यांच्या नावांचा समावेश आहे.
सध्या मद्यविक्री दुकाने व बार यांना देवदेवतांची, राष्ट्रपुरुषांची व गडकिल्ल्यांची नावे असतील तर ती ३० जूनपर्यंत बदलावीत, अशा सूचना गृह विभागाने दिल्या आहेत.