‘…पक्षाकडून कारवाई होईल असं कधी वाटलं नाही’; मनसेच्या कारवाईनंतर वसंत मोरेंची प्रतिक्रिया

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात मशिदींवरील भोंगे हटवले नाहीत, तर तिथेच समोर लाऊडस्पिकर लावून हनुमान चालिसा वाजवण्याची भुमिका त्यांनी घेतली होती. मात्र, आपण असं करणार नसल्याचं म्हणत मनसेचे माजी पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी याविरोधात भूमिका घेतली. या मुद्दयावरुन पक्षानं त्यांची शहराध्यक्षपदावरुन उचलबांगडी केली आहे. या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी वसंत मोरे म्हणाले की, मला नेहमी जी भिती वाटत होती ती हीच होती. हीच भूमिका मी पक्षासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. २००७ पासून १७ पर्यंत इथले मुस्लीम बांधव एका हिंदूसाठी कायम पुढे आले आहेत. पण यांच्या दारात जाऊन भोंगे वाजवायचे, काहीतरी भूमिका घ्यायची, एकमेकांशी वाद घालायचे ही माझी कधी भूमिका नव्हती कधी”.

“ज्या गोष्टींची मला भीती होती, ती मी मांडली होती. मी इतक्या वर्षांत यांच्यावर प्रेम केलंय. हे असंच कधी मिळत नाही. मी माध्यमांत फक्त एवढंच बोललो की हे असं काही होणार नाही. तर लगेच बोलायला लागले की साहेबांचा आदेश मोडला वगैरे”, असं देखील वसंत मोरे म्हणाले आहेत.

दरम्यान, अशा कारणासाठी पक्षाकडून कारवाई होईल, असं कधी वाटलं नसल्याची खंत यावेळी वसंत मोरे यांनी बोलून दाखवली. यावेळी बोलताना वसंत मोरे यांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. “माझ्यावर पक्ष कारवाई करेल, अशा विषयासाठी हे मला कधी वाटलं नव्हतं. या पक्षात वयाची २७ वर्ष घातली. हकालपट्टी हा विषय मला खूप लागलाय. वसंत मोरेची हकालपट्टी होऊ शकत नाही. माझ्या कार्यकर्त्यांना तोच शब्द लागलाय”, अशी भावनिक प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली आहे.

Sumitra nalawade: