बीड : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात मशिदींवरील भोंगे हटवले नाहीत, तर तिथेच समोर लाऊडस्पिकर लावून हनुमान चालिसा वाजवण्याची भुमिका त्यांनी घेतली होती. मात्र, आपण असं करणार नसल्याचं म्हणत मनसेचे माजी पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी याविरोधात भूमिका घेतली. या मुद्दयावरुन पक्षानं त्यांची शहराध्यक्षपदावरुन उचलबांगडी केली आहे. तसंच यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये एका जाहीर सभेत बोलताना राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
“सध्याचं राज्यातलं वातावरण गढूळ करण्याचं काम सुरू आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. वर्षानुवर्ष आपण गुण्या गोविंदाने नांदतोय. रामनवमी, हनुमान जयंती, आंबेडकर जयंती, रमजान, गुढीपाडवा असे सगळे सण एकमेकांना शुभेच्छा देऊन आपण साजरे करतोय. पण काय कारण आहे हो? भोंगे बंद करा, अमकं करा.. मग इतक्या आधीपासून तुम्ही काय केलं? तेव्हा कळलं नाही का? आज राज्य करोनाच्या संकटानंतर रुळावर आणण्याचा प्रयत्न आम्ही करतोय”, असं अजित पवार म्हणाले आहेत.