महाविकास आघाडीच्या द़ृष्टीने निवडणूक जिंकण्याचा कोल्हापूर पॅटर्न सापडला, असे त्यांना वाटत असले तरी एका निवडणुकीवरून धार्मिकतेच्या गाभ्याला पुरोगामित्वाचा मुलामा लावून तो मतदारांना सादर करणे हे दरवेळी शक्य होणारे नाही.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे येथे घेतलेल्या सभेचे पडसाद हनुमान जन्मोेत्सवानिमित्ताने राज्यभर उमटलेले दिसले. या पडसादामध्ये हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम राज्यात सुरू असताना समर्थ रामदासस्वामी यांच्या भीमरूपीच्या पठणाचा कार्यक्रम कोणी का घेतला नाही, हे मात्र कोेडेच आहे. राज ठाकरे यांनी हनुमान चालिसा पठण करण्यास सांगितले. त्यामागे विशिष्ट कारण आहे. त्यांना राज्याच्या राजकारणाबरोबर आता परप्रांतीयांना घेऊन त्यांच्या राजकारणाचे घोडे पुढे दामटायचे आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आपली मांड ठोेकली आहे. हनुमान चालिसा हा हिंदी भाषक पट्ट्यातील मतदारांना खूश करण्याचा सोपा मंत्र आहे आणि तो मंत्र राज ठाकरे यांनी उच्चारल्यावर राष्ट्रवादी आणि शिवसेनेनेही त्याच मंत्राचे पठण केले. एखाद्या विचारामागे फरफटत जाण्याची वृत्ती राजकीय पक्षांनाही सुटत नाही, हेच यातून सिद्ध झाले.
हनुमान चालिसाचा पाठ करण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केल्यावर इतरांनी तोच कित्ता गिरवण्याचे कारण काय होेते? उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी समारंभपूर्वक याच गोष्टी करीत ईदनिमित्ताने रोजाचे आयोजन करणे म्हणजे ज्या विचारामागे फरफटत जात आहे, तो विचार अधिक मोठा करणे असाच अर्थ आहे. एकीकडे राज्यातील महत्त्वाचे पक्ष दादरपासून नागपूरपर्यंत हनुमान चालिसा वाचत असताना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील मशिदींवरील भोंगे हटवण्याची मागणी फेटाळून लावतात. याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे कोणतेही आदेश नाहीत आणि परवानगीने भोंगे लावण्यात आली असतील, तर ते काढण्याचा प्रश्न उद्भवत नाहीत, असे सांगत वेळ आणि आवाजाची बंधने पाळण्याचे आवाहन त्यांनी केले.
आता वेळ आणि आवाज यामधील वेळेच्याबाबतीत गृहमंत्रालय काय करू शकणार आहे, याचे कारण मुस्लिम बांधवांकडून दिली जाणारी बांग गृहमंत्रालयाच्या अध्यादेशावर अवलंबून नसते. त्यामुळे गुळमुळीत आदेश काढण्यात काहीच हशील नाही. मात्र आपण काही तरी करत आहोत, हे या कृतीतून दिसत असते. महाआरती आणि हनुमान जन्मोत्सवाच्यानिमित्ताने राष्ट्रवादी पक्षाला आपण नक्की पुरोगामी आहोत, की सनातनी याबाबत संभ्रम झालेला पाहायला मिळतो. राज ठाकरे यांच्या भाषणामुळे पक्षाध्यक्ष शरद पवार यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागली होती. ही उत्तरे शरद पवार हिंदू धर्म मानणारे आहेत, ते देवावर श्रद्धा ठेवतात, ते अस्तिक आहेत, रुढी-परंपरा पाळणारे आहेत हे सिद्ध करणारी होती. यामुळे शरद पवार यांची आजपर्यंत असणारी पुरोगामी ही प्रतिमा काहीशी झाकोळली गेली आहे, तर शिवसेनेने हनुमान जन्मोत्सव वाजत-गाजत साजरा करीत आम्ही नव्याने हिंदू झालो आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
आजपर्यंत कोणत्याच पक्षाने अशा पद्धतीने हनुमान जन्मोत्सव साजरा केला नव्हता. हनुमान चालिसाची आठवण झाली नव्हती. मात्र राज ठाकरे यांच्या भाषणानंतर आम्ही रुढी-परंपरावादी आहोत, हे दाखवण्याची चढाओढ शिवसेनेने सुरू केली आहे. हिंदुत्व हा आमचा मूळ पाया आहे, हे बिंबवण्यासाठी त्यांनी खटाटोप सुरू केला आहे. शिवसेनेची आजवरची वाटचाल मराठी ते हिंदुत्व अशी झाली तशीच वाटचाल राज ठाकरे यांनी सुरू केली असून त्यात तेे यशस्वी झाले तर महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांसाठी असणारी जनमानसातील जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे जाईल, अशी भीती शिवसेनेच्या विद्वानांना वाटली असावी. बाटली नवी आहे, मात्र त्यातील द्रव्य तेच आहे आणि शिवसेनेने तोे यशाचा मंत्र केल्याने राज ठाकरे तो मंत्र वापरत असतील तर आजवरच्या त्यांच्या तुलनेने अपयशी प्रवासाला तो यशाकडे नेणारा ठरणारा आहे. या गदारोळात काँग्रेस पक्ष शांत राहिला. कोल्हापूर येथील पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाने आपली जागा राखल्याने त्यांना नक्कीच आनंद वाटला असेल. कोल्हापूर उत्तरमध्ये जयश्री जाधव निवडून आल्या आणि कोल्हापूरचे पालकमंत्री काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची काँग्रेसमध्ये किंमत वाढली. एकार्थी हनुमान जन्मोत्सवानिमित्त हनुमान सतेज पाटील यांना पावला, असे म्हणावे लागेल.
या मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळवला असल तरी भारतीय जनता पक्षाच्या मतांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ही जागा पूर्वी शिवसेनेकडे होती. शिवसेनेने ही जागा आता यापुढे न लढता गमावली आहे, याचाही शिवसेनेला विचार करावा लागणार आहे. मुद्दा आहे तो काँग्रेसच्या हनुमान चालिसा उपक्रमात सहभागी न होण्याचा! या उपक्रमात सहभागी न होऊन त्यांनी आपला धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी हा शिक्का कायम ठेवला. राष्ट्रवादीला हे जमले नाही. महाविकास आघाडीच्या द़ृष्टीने निवडणूक जिंकण्याचा कोल्हापूर पॅटर्न सापडला, असे त्यांना वाटत असले तरी एका निवडणुकीवरून धार्मिकतेच्या गाभ्याला पुरोगामित्वाचा मुलामा लावून तो मतदारांना सादर करणे हे दरवेळी शक्य होणारे नाही. तेव्हा प्रत्येक पक्षाने आपल्या ध्येयधोरणांना आणि तत्त्वांना तावून सुलाखूनच मतदारांसमोेर ठेवले पाहिजे.