माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन…
पुणे : बहुसांस्कृतिक एकतेचे प्रतीक म्हणजे अण्णा भाऊ साठे होय. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे मार्क्सवादी होते की आंबेडकरवादी होते, ह्यावर आजही वादविवाद होत आहेत. परंतु माझ्या मते, ते मार्क्सवादी तर होतेच शिवाय आंबेडकरवादीही होते. मात्र, ते खऱ्या अर्थाने मानवतावादी अधिक होते आणि अशा अण्णा भाऊंच्या कर्तृत्वाचा डॉ. अविनाश सांगोलेकर ह्यांनी जो शोध घेतला आहे, तो निर्णायक महत्त्वाचा ठरतो’, अशा आशयाचे उद्गार अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी काढले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या डॉ. अविनाश सांगोलेकर लिखित ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे ह्यांचे काव्यवाड्मय : एक शोध’ ह्या समीक्षा लेखसंग्रहाच्या लोकार्पण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
व्यासपीठावर डॉ. श्रीपाल सबनीस, अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य राजेश पांडे, अध्यासन प्रमुख डॉ. सुनील भंडगे, डॉ. प्रभाकर देसाई, अॅड. श्रीधर कसबेकर, डॉ. धनंजय भिसे, डॉ. अंबादास सगट हे होते. ह्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन, मातंग साहित्य परिषद आणि शब्दवैभव प्रकाशन ह्यांनी संयुक्तपणे केले होते. अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे
ठरले आहे.
महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक हे त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. अशा प्रकारच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून अण्णा भाऊंच्या कामाचा प्रसार होणे काळाची गरज आहे.