बीआरटीमध्ये आता इतर वाहनांसाठी होणार रस्ता बंद

पुणे : पुणे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढल्याने वाहतूककोंडी निर्माण झाली आहे. पीएमपीएलला वाहतूक सरळ व सुरक्षित व्हावी, म्हणून बीआरटीचा मार्ग तयार केला गेला. परंतु या बीआरटीमध्येसुद्धा खासगी वाहतूकदार घुसत असल्याने त्या ठिकाणीसुद्धा पीएमपीएलच्या वाहतुकीला अडथळा होत आहे. या मार्गामध्ये खासगी वाहने सुसाट धावत असून सुरक्षारक्षक नसल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.

चारचाकीसह दुचाकी बीआरटीतून जात असल्याने पीएमपीएलला वाहतूक करण्यास अडथळा निर्माण होत आहे. नागरिकही जीव मुठीत घेऊन बसची वाट पाहत बसलेले असतात. खासगी वाहनांच्या लांबच्या लांब रांगा बीआरटीमधून हटत नाहीत. पीएमपी बसला जाण्यासाठी जागाच उरत नसल्याने पीएमपी सेवा रस्त्यावरून धावत आहे. केवळ मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पीएमपीच्या नियमांचे पालन होताना दिसते. याव्यतिरिक्त इतर बीआरटी मार्गावर वाहतुकीचे नियमन होताना दिसत नाही. वाहनधारकांना दंड ठोठावून आणि शिस्तीचे धडे देऊनही वाहनचालक सुसाट धावत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे.

याच पार्श्वभूमीवर डेक्कन कॉलेज चौकाजवळील बीआरटी मार्गात पीएमपीने पहिला ‘बूम बॅरिअर’ बसविला आहे. हा प्रायोगिक तत्त्वावर असून, लवकरच शहरातील उर्वरित सात बीआरटी मार्गांवर विविध ठिकाणी बसविण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. शहरात दिवसेंदिवस दुचाकीचालकांच्या संख्येत वाढ होत असल्याने मोठ्या वाहनांना वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होतो.

‘बूम बॅरिअर’ पीएमपीने ‘संगमवाडी ते विश्रांतवाडी’ या बीआरटी मार्गावर डेक्कन कॉलेजजवळ नुकताच बसविला आहे. त्याची पीएमपीच्या अधिकार्‍यांनी पाहणी केली. आता दुसरा ‘बूम बॅरिअर’ साठे बिस्कीट चौकात बसविण्यात येणार आहे. त्यामुळे बीआरटी मार्ग आता खुला राहील अशी अपेक्षा.

admin: