नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी 101 हून अधिक लष्करी यंत्रणा आणि शस्त्रास्त्रांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार या यादीतील लष्करी यंत्रणा आणि शस्त्रांच्या आयातीवर पुढील पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात येणार आहे. या निर्णयामुळे संरक्षण मंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेच्या दिशेनं टाकलेले हे पाऊल आहे. संरक्षण उपकरणांच्या स्वदेशीकरणाची सकारात्मक यादी जाहीर करताना आनंद होत असल्याची प्रतिक्रियादेखील राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली आहे.
आज एका कार्यक्रमात त्यांनी ही यादी जाहीर केली आहे. या आधी पहिली सकारात्मक स्वदेशीकरण यादी ऑगस्ट 2020 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती, ज्यामध्ये 155 मिमी/39 कॅल अल्ट्रा-लाइट हॉविट्झर्स, लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCW) Mk-IA-प्रगत स्वदेशी साहित्य, पारंपरिक पाणबुडी आणि दळणवळण उपग्रह GSAT-7C यांचा समावेश होता. राजनाथ सिंह यांनी जाहीर केलेल्या यादीमध्ये सेन्सर्स, शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा, नौदल उपयोगिता हेलिकॉप्टर, गस्ती जहाजे, जहाजविरोधी क्षेपणास्त्रे आणि रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्रांसह प्रमुख उपकरणे आणि यंत्रणांचा समावेश असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मागिल वर्षी मे महिन्यात, सरकारने साडेचार वर्षांच्या कालमर्यादेसह अतिरिक्त 108 लष्करी शस्त्रे आणि पुढील पिढीच्या युद्धनौका, एअरबोर्न पूर्व चेतावणी प्रणाली, टँक इंजिन आणि रडार यांसारख्या प्रणालींच्या आयातीवर निर्बंध मंजूर केले. ही यादी जाहीर केल्याने सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राच्या सहभागासह स्वदेशीकरणाला प्रोत्साहन मिळेल असे राजनाथ सिंह म्हणाले.