मुंबई : आज पंतप्रधान कार्यालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट झाली. त्यांच्या या भेटीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मालमत्तांवर ईडीने कारवाई केल्यानंतर राज्य विरुद्ध केंद्र संघर्ष आणखी शिगेला गेला आहे. त्या पार्श्वभूमीवर झालेली ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. सोबतच यासंदर्भात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रविण दरेकर म्हणाले, महाविकास आघाडीचे काही मंत्री तुरूंगात आहेत. घरावर ईडीच्या धाडी पडल्या आहेत. संजय राऊतापर्यंत ईडीच्या धाडी पडल्या आहेत. संजय राऊतांपर्यंत केंद्रीय तपास यंत्रणा पोहोचल्या आहेत. त्याची गांभीर्य आणि दाहकता पाहता ही भेट असू शकते. मात्र, मोदींनी एखादी भूमिका घेतली की तडजोड करत नाहीत. भ्रष्टाचाऱ्यांना सोडलं जाणार नाही, हीच भूमिका मोदींनी आजवर मांडली आहे. पवार साहेबांच्या भेटीचा थांगपत्ता आजवर कुणाला लागत नाही. यासंदर्भातील गोष्टी येणाऱ्या काळात पुढे येतीलच. महाराष्ट्र अथवा देशातील राजकीय संस्कृती आहे की, कुणी चहापान अथवा स्नेहभोजन ठेवलं तर आपण राजकीय अभिनिवेष बाजूला ठेवून जातो. त्यामुळे चहापान आणि राजकीय समीकरणांचा काही संबंध असेल असं वाटत नाही.
पवार डॅमेज कंट्रोल करण्यात माहीर आहेत. भूकंप असोत वा इतर आपत्ती असोत, त्या त्या वेळी निवारण करण्याची त्यांची हातोटी आहे. जवळच्या प्रमुख नेत्यांवर कारवाई होत असताना कुठेतरी हे थांबलं पाहिजे, या अर्थाने या भेटीमागे कारणे असू शकतो. यासंदर्भात पंतप्रधान मोदींनी आधीच सांगितलंय की, देशहिताच्या आड असणाऱ्या लोकांना मी सहन करणार नाही. मविआचा नेता म्हणून कारवाई झालेल्या नेत्यांना दिलासा देण्याची भूमिका पवारांची असू शकते, असंही दरेकर म्हणाले.