मोबाइल गहाळ झालाय… गुन्हा दाखल होणार

मुंबई : कोणतीही वस्तू हरवली किंवा गहाळ झाली, चोरीला गेली तर आपण पोलिसांमध्ये तक्रार नोंदवित असतो. त्या तक्रारीला आपण मिसिंग कम्प्लेंट म्हणतो. पण आता मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे मोबाइल गायब झाला असेल अथवा चोरी झाल्यास त्याबाबत पोलिस ठाण्यात थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे संबंधित अधिकार्‍यांना तक्रारदाराचे म्हणणे ऐकून घेऊन एफआयआर दाखल करावा लागणार आहे.

आयपीसी सेक्शन १६८/ए या कलमानुसार एफआयआर दाखल न करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे. संजय पांडे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. पोलिस मोबाइलसंबंधीच्या तक्रारी या मिसिंग रिपोर्टमध्ये दाखल करून घेत होते. मात्र पोलिस आयुक्तांच्या या निर्णयाने सध्या पोलिसही बुचकळ्यात पडले आहेत. रेशनकार्ड ते वाहनांचे आरसी बुक आणि लायसन्सचा देखील तपास करावा लागणार आहे. यामुळे ही चोरी नसूनही पोलिसांचा चौकशीत वेळ जाणार आहे. पोलिस दलात मनुष्यबळ कमी असल्याने तपासाचा वेग कमी आहे.

दखलपात्र/अदखलपात्र गुन्ह्यात फरक?
दखलपात्र गुन्हे आणि अदखलपात्र गुन्हे असे गुन्ह्यांचे वर्गीकरण केले जाते. चोरी, घरफोडी, मोटारवाहन चोरी, अपघात, सोनसाखळी चोरी, हल्ला, बलात्कार, हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी हे गुन्हे दखलपात्र आहेत. दखलपात्र गुन्ह्यांची फिर्याद नोंदविल्यानंतर एफआयआरची प्रत विनाशुल्क फिर्यादीस देण्यात येते. किरकोळ गुन्हे अदखलपात्र प्रकारात मोडतात. तर अदखलपात्र गुन्ह्यांत पोलिस न्यायालयाच्या आदेशाशिवाय तपास करू शकत नाहीत.

admin: