पुणे : मागील आठवडा भरापासून चालू आसलेल्या नाराजी नाट्यानंतर आज अखेर वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. मनसेच्या भोंग्यांविरोधातील भूमिकेला दुजोरा न दिल्याने मोरे यांची पुणे शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी झाली. यानंतर साईनाथ बाबर यांच्या यांच्या हाती मनसेने पुण्याची सूत्र दिली. अखेर वसंत मोरे, राज ठाकरेंच्या भेटीनंतर आता त्यांची नाराजी दूर झाल्याचं मोरे यांनी स्पष्ट केले आहे.
पुढे मोरे म्हणाले, ठाण्यातील सभेत सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत. राज साहेबांच्या भेटीवर मी १०० टक्के समाधानी आहे. उद्याच्या सभेला ये, असं साहेब म्हणाल्याचं मोरेंनी माध्यमांना सांगितलं. मी पहिल्यापासून सांगत होतो कि, मी मनसेत राहणार आहे. उद्याची ठाण्यातील उत्तर सभा आहे. त्या सभेत सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत, असे मोरे म्हणाले.
पुण्याचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी देखील आज राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. पण भेटीचे कारण मात्र समजले नाही. वसंत मोरे यांनी सर्वात आधी शर्मिला ठाकरेंची भेट घेतली. यानंतर ते राज ठाकरेंच्या भेटीला गेले. यामध्ये खलबतं झाल्यानंतर त्यांनी माध्यमांना ‘सगळ्या ऑफर संपल्या’ असं सांगितलं. आपण कोणत्याही पक्षात जाणार नाही, शेवटपर्यंत राज साहेबांचा सैनिक म्हणून काम करणार आहे.